नेन्सी आणि अनिशा खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्यांची मैत्री इतकी घनिष्ट आहे की एकमेकींचे त्या आंधळ्याप्रमाणे अनुकरण करतात. एके दिवशी, अनिशा एका ध्यान वर्गाची सभासद होते. स्वाभाविकपणे नेन्सीला देखील तेच करायचे असते पण त्या वर्गाची वेळ तिच्या कामाच्या वेळेमध्ये येते. आपण वर्गात जाऊ न शकल्यामुळे नेन्सी अनिशाच्या ध्यानाचे निरीक्षण करते – २० मिनिटांसाठी डोळे बंद करून शांत बसणे – नेन्सीला वाटले किती सोपे आहे. ती सुद्धा तसा प्रयत्न करण्याचे ठरविते.
१ला दिवस: डोळे बंद केल्याबरोबर ती दिवसभराच्या (आणि पुढील दिवसांच्या) कामाची आखणी करायला सुरुवात करते. परिणाम: अपेक्षाभंग झाल्याचे वाटून ती डोळे उघडते कारण तिला अनिशाने तर सांगितले होते की ध्यानानंतर खूप छान अनुभव येतो. पण तिला तिच्या मनावर पूर्वीपेक्षा अधिकच विचारांचे आघात जाणवू लागले.
४था दिवस: आज ‘अतिशय उत्तम अनुभव’ मिळविण्याच्या अपेक्षेने ती दोन दिवसांनी पुन्हा बसते. परिणाम: ध्यान घडवून आणण्याचा ती खूप प्रयत्न करते पण नेहमीप्रमाणे विचारांच्या साखळीनेच ते संपते.
६वा दिवस: यावेळेस रात्री ११.३० वाजता उशिरा जेवल्यानंतर तिला संधी मिळते. तडस पोट आणि तिच्या थकलेल्या मनामुळे ध्यानासाठी डोळे झाकल्याबरोबर ती डुलक्या घेऊ लागते. २० मिनिटानंतर जेव्हा अलार्म वाजतो, तेव्हा ती ध्यानातून बाहेर येते (खरे तर झोपेतून दचकून उठते). परिणाम: तिचा अपेक्षाभंग होतो आणि तिला ध्यान का होत नाही या विचाराने नैराश्य येते. परिणाम: त्यापुढे ध्यान करणे ती सोडून देते.
नेन्सी सारखा तुमचा अनुभव आहे का? तुम्ही नेहमी असे म्हणता का की: “मी ध्यान करतो पण अजून फरक पडल्याचा अनुभव येत नाही?”
तिला वाटते त्याप्रमाणे नेन्सीचे ध्यान का होऊ शकत नसेल हे समजून घेऊ आणि तिला लवकरच या साधनेत परत आणूया.
#१: नेन्सी ची पध्दत योग्य आहे का?
एखाद्या नियमित ध्यान वर्गातील अनुभवी प्रशिक्षकाकडून औपचारिकपणे व्यवस्थित धडे घेणे गरजेचे आहे. एक प्रशिक्षक तुम्हाला ध्यानाच्या योग्य पद्धतीचे मार्गदर्शन करतील शिवाय ध्यानावर (विपरीत) परिणामास कारणीभूत परिस्थितीचे ज्ञान करून देतील (म्हणजे तुम्हाला आपले ध्यान का होत नाही याचे नक्की कारण सापडेल).
#२: ज्याप्रमाणे तुम्ही अनिशावर विश्वास ठेवता, त्याचप्रमाणे या तंत्रावर देखील विश्वास ठेवा
एकदा तुम्हाला ध्यान करण्याची योग्य पद्धत कळली की त्या तंत्रावर श्रद्धा असणे फार महत्त्वाचे आहे – ते तंत्र बरोबर असण्याची श्रद्धा, मी ते योग्य रीतीने करणार आहे याबद्दल श्रद्धा, आणि (आज न उद्या) त्याचे चांगले परिणाम होणार आहे ही श्रद्धा.
#३: नेन्सीने नियमित सराव करणे गरजेचे होते
तुमच्या लक्षात आले असेल की नेन्सीची ध्यान साधना खूपच अनियमित होती. पहिल्या दिवशी तिने सुरुवात केली, नंतर दोन दिवस दांडी मारली, चौथ्या दिवशी पुढे चालू ठेऊन पुन्हा एक दिवस मध्ये चुकवला. कोणतीही साधना साध्य होण्यासाठी, वेळ हा लागतोच, धीर आणि वचनबद्धता देखील. कधीकधी फक्त तीनच दिवस (नेन्सीच्या बाबतीत घडले तसे), एक आठवडा किंवा दोन आठवडे ध्यान केल्याने आपल्याला असे वाटू लागते की काहीच होत नाही. परंतु, वस्तुस्थिती ती नाही.
आपल्या नकळत, ध्यान हे खूप सूक्ष्म आणि खोल स्थरावर काम करते. पहिल्या दिवशी नेन्सीला वाटले की ते संपूर्ण २० मिनिटे बसले असता मना मध्ये विचारांचे जाळे तयार होऊन डोके बधीर झाले होते, पण त्या वीस मिनिटांच्या काळात असा एक क्षण येतो जेव्हा तुम्ही विचारांच्या पलीकडे जाता. आपल्या नियमित सरावाने आपल्याला तो क्षण हळूहळू लक्षात येऊ लागतो.
#४: कदाचित ते घडवून आणण्यासाठी नेन्सी खूप पराकाष्ठा करीत होती
ध्यानसाधनेसाठी काही युक्त्या
१. शांत जागेची निवड करा जिथे तुम्ही स्व: बरोबर राहू शकाल व सखोल ध्यान करू शकाल.
२. योग्य सुट्सुटीत वेळ निवडा – ध्यान करायला फक्त २० मिनिटे तर लागतात!
३. एकत्रितपणे ग्रुपमध्ये ध्यान करा – फरक पडतो.
४. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही ध्यान करा, पण जेव्हा तुम्ही निरुत्साही असता तेव्हा तर नक्कीच करा, तुमचा मूड चांगला होण्यास मदत होते.
ध्यान ही एक घटना असते; ती घडवून आणण्यासाठी तुम्हाला खरेच काही करावे लागत नाही! ध्यान घडवून आणण्याच्या आतुरतेपायी आपण प्रयत्न करतो आणि विनाकारण आपल्याला ताण येतो; ज्यामुळे ध्यान चांगले होण्याची शक्यता कमी होते. कधीकधी आनंददायी अनुभव येण्याच्या अपेक्षाच त्रासदायक ठरू शकतात आणि त्या आपल्या साधनेत अडथळा ठरतात.
ध्यानाला बसल्यावर सर्व अपेक्षा सोडून द्या. प्रत्येक दिवशी प्रत्येक अनुभव समान असेलच असे नाही हे स्वीकार करा. कधी तुम्हाला विश्रामदायी अनुभव येऊ शकतो आणि कदाचित काही वेळा ध्यान “इतके चांगले नाही” असे वाटेल. ते ठीक आहे! विश्राम करा आणि ध्यान (करणे) चालू ठेवा.
#५: रात्री ११.३० वाजता, झोप होते ध्यान नाही
ध्यानासाठी वेळ अगदी काळजीपूर्वक निवडा. त्यासाठी फक्त २० मिनिटे वेळ लागतो हे मान्य केले तरी आजचे धकाधकीचे जीवन सकाळी किंवा संध्याकाळच्या “आदर्श वेळी” तुम्हाला ध्यान करण्याची मुभा देईलच असे नाही - पण रात्री उशिरा सुद्धा काही योग्य वेळ नसते! त्यापेक्षा – दिवसा एखादी सुट्सुटीत वेळ तुम्ही निवडू शकता – उदा. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाआधी किंवा संध्याकाळी लवकर. तसेच भरल्या पोटाने ध्यान करणे देखील योग्य नव्हे कारण त्यावेळी झोप लागण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. रिकाम्या पोटी किंवा हलक्या पोटी ध्यान करणे उत्तम.
#६: ती योग्य आहार घेते का?
आपल्या खाण्याची सवय / आहार आपले ध्यान चांगले किंवा सामान्य होण्यास महत्वाची भूमिका बजावते. मिष्ठान्न, मसालेदार अन्न, उत्तेजक पेय, बाहेरील पदार्थ किंवा मांसाहार याचा स्वैराचार किंवा अतिरेक या मुळे तुमच्या ध्यानाच्या दर्जावर परिणाम घडवितो. योग्य खा, आरोग्यदायी खा आणि आपल्या आनंददायी ध्यानाच्या अनुभवाचा मार्ग मोकळा करा.
तेव्हा पुढच्या वेळेस तुम्हाला जर वाटले की, “माझे ध्यान नीट होत नाही” तेव्हा नेन्सीच्या वरील ६ कारणांचा अभ्यास करा व स्वतःशी ते तपासून पहा; त्यापैकी माझ्याबाबतीत काही लागू तर होत नाही? त्याशिवाय जेव्हा गरज वाटेल तेव्हा तुमच्या प्रशिक्षकाशी संवाद साधा, तुम्ही हे तंत्र किंवा अभ्यासक्रम खूप आधी जरी केला असला तरी काही हरकत नाही. हीच ती वेळ आहे. आणि तुम्ही ध्यान करण्याचा निर्धार केला असेल तर असो. विश्राम करा. ध्यान घडेल.
श्री श्री रविशंकर यांच्या विवेचनावर आधारित
रेखाचित्र: नीलाद्री दत्त
मार्च ११, १२ आणि १३ २०१६ रोजी होणारा जागतिक सांस्कृतिक उत्सव (वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल) म्हणजे दि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सेवा, माणुसकी, अध्यात्म आणि मानवतावादी मुल्ये या क्षेत्रातील ३५ वर्षाच्या कार्याचे पर्व साजरे करणे होय. हा उत्सव म्हणजे संपूर्ण जगभरातील संस्कृतींमधील वैविध्य साजरे करताना मानवी समाजाचे सदस्य म्हणून आपल्यातील एकोप्याचे दर्शन घडवून आणेल.