“शीख या शब्दाचा अर्थ म्हणजे शिष्य, जो सतत प्रगतीची इच्छा ठेवतो."
गुरु नानक देव ! पाचशे वर्षापूर्वी पंजाब मध्ये संत होऊन गेले ज्यांनी अध्यात्मिकतेचा, अद्वैत भाव आणि भक्तीचा संदेश पोहोचवण्यासाठी बगदाद पर्यंत प्रवास केला. पूर्ण शीख समाज त्यांची जयंती साजरी करतो, हा शिखांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज कार्तिक पौर्णिमा - देव दिवाळी असते. आजच जैनांचे महान तीर्थंकर महावीर यांना आत्मज्ञान प्राप्त झाले.
शीख धर्मामध्ये दहा गुरु आहेत, गुरु नानक देव हे संस्थापक गुरु होय. या सर्व शीख धर्मगुरुंचे चरित्र हृदयाला भावणारे आणि आपल्याला प्रगती पथावर नेणारे आहे. त्यांचे त्याग महान आहेत. मानवता आणि सदाचरणाच्या रक्षणासाठी त्यांनी आपले सर्वस्व त्यागले. परमोच्च ज्ञानाचे सार त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत दिले.
गुरु नानक देव यांचा संदेश !
गुरु नानक देव भक्ती रसा बद्धल बोलत. त्यांनी स्वतःला भक्तीयोगा ला वाहून घेतले होते. ( भक्तीयोग-ईश्वराला प्राप्त करून घ्यायचा योगाचा एक स्तंभ आहे.) तर गुरु गोविंद सिंगजी कर्मयोगी होते. त्यांची ‘कर्म करणे हाच मुक्तीचा मार्ग आहे,’ यावर श्रद्धा होती. येथे आपण भक्ती ते कर्म अशी प्रगती पाहू शकतो.
‘बाह्य घडामोडीमध्ये अडकून ईश्वराला विसरू नका. ईश्वराचे नामस्मरण करा, अंतर्मुख व्हा’ हा गुरु नानक देव यांनी संदेश दिला. लोकांना यासाठी प्रवृत्त केले.
गुरु नानक देव यांची भक्तीकथा
गुरु नानक देवांचे वडील त्यांना बाजारात भाजी विकायला पाठवायचे. भाजी विकताना, काहीही मोजताना ते ‘तेरा’ संख्येला अडकायचे. (हिंदीमध्ये ‘तेरा’ म्हणजे तुझा, नां.) जेंव्हा पण ते ‘तेरा’ उच्चारायचे ते ईश्वराच्या स्मरणात रमून जायचे. जे काही ते करत त्यांचे लक्ष त्यात नसायचे तर ईश्वराकडेच असायचे. ते सतत म्हणायचे, “मैं तेरा, मैं तेरा, मैं तेरा.”
त्यांचे संपूर्ण जीवन शुद्ध प्रेम, ज्ञान आणि शौर्य यांनी युक्त होते.
‘जपजी साहिब’ – शिखांची पवित्र प्रार्थना – गुरु नानक देवांनी लिहिली.
गुरु ग्रंथ साहिब मध्ये एक सुंदर प्रार्थना आहे. ती अशी – एक ओंकार (ईश्वर एक आहे), सतनाम (त्याचे नामच सत्य आहे), करता पुरख (तो निर्माता आहे), निर्भाऊ (तो निर्भय आहे), निर्वैर (त्याचे कोणाशीही वैर नाही), अकाल मुरत (तो अमर्त्य आहे), अजुनी सैभंग (तो जन्म आणि मृत्यू च्या पार आहे), गुर प्रसाद (सच्च्या गुरूच्या करुणेचा तो ज्ञात आहे), जप (नामस्मरण), आद सच (तो आदी सत्य आहे), जुगाद सच (तो सनातन सत्य आहे), हैं भी सच (तो सत्यच आहे), नानक होसे भी सच (भविष्यामध्ये ही तो सत्यच असणार आहे).”
समस्त विश्व ओंकारातून निर्माण झाले आहे, आपल्या आजूबाजूला जे आहे ते निव्वळ या ओंकाराच्या तरंगांतून निर्माण झाले आहे. हा ओम तुम्ही गुरु कृपेमुळेच जाणू शकता. जे आहे ते सर्वत्र आहे पण ते जाणण्यासाठी गुरूंची गरज आहे.
चेतनेच्या मुळाशी जो स्थायी ध्वनी आहे तो ओम होय. सागराच्या तळाशी जाऊन लाटांना लक्ष देऊन ऐका – ओम ऐकू येईल. पर्वतावर जाऊन वाऱ्याला लक्ष देऊन ऐका – ओम ऐकू येईल. जन्मापूर्व आपण ओम मध्ये होतो, मृत्यू नंतर आपण ओम या वैश्विक ध्वनी मध्ये सामाऊन जाणार आहोत. सर्व निर्मितीचे उगम स्थान ओम आहे. म्हणून बुद्ध,जैन, सिख, हिंदू, तावो आणि शिंतो-सर्व जाती धर्मामध्ये ओम ला फार उच्च दर्जा आहे.
गुरु नानक देव यांच्या संदेशाने प्रेरित होऊया
आज, “सतत बदलणाऱ्या जगामध्ये, मायेमध्ये न फसता, आनंदी राहूया-इतरांना आनंदी करूया, सेवा करूया, प्रार्थना नामस्मरण करूया आणि धर्म रक्षणाचे कार्य करूया,” या संदेशाने प्रेरणा घेऊया.