तुमच्या मोबाईल फोनमुळे तुमची मान, डोकं किंवा खांदे दुखतात का?
आपण प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात राहतो आणि फोन हे निर्विवादपणे जगात सर्वात जास्त वापरले जाणारे उपकरण आहे. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, व्यक्तिगत नातेसंबंधांपासून व्यवसायापर्यंत सगळीकडे मोबाईल उपकरणे आपले जग बदलून टाकत आहेत.
पण त्याचा अतिवापर किंवा खरेतर गैरवापरामुळे जीवनात अनेक धोके निर्माण झाले आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही हा लेख तुमच्या मोबाईल फोनवर वाचत असाल तर तुमचे दंड बाजूला वाकले जातात, पाठीला बाक येतो आणि मान पुढच्या बाजूला वाकली जाते. हो ना ? कदाचित हे अजून लक्षात आले असेल किंवा नसेल की यामुळे तुमची मान दुखत असेल. उपचार तज्ञ ज्याला, ‘टेक्स्ट नेक’ म्हणतात तशा स्थितीकडे तुमची वाटचाल चालू झालेली असू शकते.
सर्व साधारण माणसाच्या डोक्याचे वजन साधारण स्थितीत, म्हणजे तुमचे कान खांद्याच्या वर असतात तेव्हा, ४.५ कि.ग्रॅ. असते. तुमचे डोके पुढे वाकते तेव्हा, दर इंचाला पाठीच्या काण्यावरील दाब दुपटीने वाढतो. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मांडीवरील स्मार्ट फोन कडे बघत असाल तर तुमच्या डोक्याचे वजन १० किंवा १४ किलो सारखे वाटते. हा जास्तीचा भार तुमच्या कण्यावर ताण आणतो आणि तो सरळ रेषेतून सरकू शकतो.
थांबा ! हा लेख तुम्हाला ही उपकरणे वापरण्यापासून नाउमेद करण्यासाठी नाही आहे. या लहानशा उपकरणांमुळे सर्वांचे जीवन जास्त सोयीचे झाले आहे आणि या धोक्यांना दूर ठेवण्यासाठी काही उपयुक्त सूचना लक्षात घेतल्या तर नक्कीच मदत होईल. काही योगाच्या सूचना तुम्हाला खूप काळ उपयोगी पडतील.
तुमची पाठ आणि मान मजबूत आणि लवचिक असेल तर स्वाभाविकपणे अशा तणावाला सामोरे जाताना मदत होईल आणि मोबाईल फोनच्या अति वापरामुळे होणारे स्नायूंचे त्रास कमी होतील. पाठीच्या आणि मानेच्या अवघडलेल्या स्नायूंना मोकळे करून त्यांना बळकटी आणणारी काही योगासने आणि व्यायाम आहेत. ते नियमितपणे करा आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर टेक्स्टींग आणि चॅटिंग करताना अडथळा आणणाऱ्या त्रासदायक वेदना यांच्यापासून सुटका करून घ्या !!
- कान ओढणे आणि मालिश: कानाची पाळी वरपासून सुरु करुन खालपर्यंत दाबा. दोन वेळा बाहेरच्या बाजूला ओढा आणि घड्याळाच्या दिशेने आणि उलट्या दिशेने गोल फिरवा. त्यामुळे कानाच्या भोवतालच्या भागाचा ताण निघून जाईल.
- हात ताणणे: हात डोक्यावर ताणा आणि हाताचे तळवे आकाशाकडे करा आणि वरच्या बाजूला ढकला. याचाच पुढचा भाग म्हणजे, हात आणि खांद्यातील ताणासाठी, दोन्ही हात ताठ स्थितीत खांद्यापर्यंत खाली आणा आणि हाताची बोटे स्वत:कडे खेचा आणि टा टा केल्याप्रामाने हात दोन तीन वेळा हलवा.
- खांदे गोल फिरवणे: दोन्ही हात लांब करा आणि अंगठा करंगळीच्या जवळ ठेवा. हात स्थिर ठेवत खांदे दोन्ही दिशेने पाच पाच वेळा फिरवा.
- तळहात दाबणे: दोन्ही हाताचे तळवे छातीच्या समोर आणा. खांदे स्थिर ठेवत एकमेकावर जोरात दाबा. दोन तीन वेळा दाबा आणि सोडा. हात सोडा आणि पुन्हा एकदा करा.
- हाताचे कोपरे: दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंतवून छातीच्या समोर ठेवा. हाताचे तळवे तसेच छातीच्या समोर ठेवत हाताचे कोपरे आणि खांदे लाटेप्रमाणे वरखाली करा. आडवा इंग्रजी आठचा आकडा काढा.
- खांदे ताणणे: तुमचा उजवा हात डोक्यावर ठेवा आणि डाव्या हाताने डावा गुडघा घट्ट धरून ठेवा. आता डावा हात तिथेच ठेऊन तुमचा उजवा हात डोक्यापासून खाली आणत कुल्यावर ठेवा आणि पुन्हा डोक्यावर ठेवा. असे काही वेळा केल्यानंतर दुसऱ्या हाताने असेच करा.
- अंगठा पिळणे: दोन्ही अंगठे चातीसमोर आणा आणि दोन्ही बाजूने काही वेळा गोल फिरवा. सर्व बोटे घट्ट आवळा आणि सैल सोडा. असे आणखी दोन–चार वेळा करा.
वेदना दूर करण्यासाठी ही योगासने करत असताना खालील गोष्टी विसरू नका.
- तुमच्या मोबाईल उपकरणाची जागा बदला: तुमचा मोबाईल तुम्हाला तुमचे डोके पुढे झुकायला लावेल असा, म्हणजे मांडीवर ठेवण्याच्या ऐवजी असा धारा की तो तुमच्या डोळ्याच्या समोर येईल.
- जरा विश्रांती द्या: लक्षात घ्या की तुम्ही ही उपकरणे दिवसभर वापरत असता. अधून मधून स्वत:ला विश्रांती द्याच किंवा स्वत:ची बैठक स्थिती बदला
आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यापासून आणि स्मार्टफोन योगी बनण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी या योगासनांचा नियमित सराव करा.
आर्ट ऑफ लिव्हिंग योगाच्या संचालक, कमलेश बारवाल यांनी दिलेल्या माहितीवर हा लेख आधारित आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ते योग तज्ञ म्हणून काम करीत आहेत. त्यांनी जगभर प्रवास करून विविध संस्कृती आणि धर्मातील अनेक लोकांना योगाचे फायदे शिकवले आहेत.