श्री श्री योग च्या जेष्ठ प्रशिक्षकांकडून ‘योगाची कला’ म्हणजेच आसने कशी करावीत याबद्दल उपयुक्त सूचना :
तुम्हाला आठवतंय, तुमच्या आवडीचा छंद जसे फोटोग्राफी, संगीत, नृत्य असे काहीही असो, जेंव्हा तो जोपासायला अगदी पहिल्यांदा सुरुवात केलीत, सुरुवातीला तुम्हाला ते सराईतपणे येण्यासाठी किती झटावे लागले होते?, खूप प्रयास करावे लागले होते. आपल्या कॅमेरात अप्रतिम दृश्य कैद करण्यासाठी, गाण्याची अचूक ताण घेण्यासाठी, नृत्याचा योग्य तो पदन्यास करण्यासाठी तुम्हाला बरीच हुरहूर लागलेली असायची. नंतर प्रत्येक सरावागणिक ते आपोआप सुधारत गेलं, आणि जसे तुम्ही त्या कलेवर प्रभुत्व गाजवू लागलात तसे ते विनासायास, उत्तमरित्या जमू लागले.
आपण योगासने करताना देखील नेमकं हेच घडतं. योगासने हळुवारपणे करा, अंतिम स्थितीत सहजपणे स्थिरावण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या - तुम्हाला जाणवू लागेल की तुम्ही आता आसने सफाईदार करू लागला आहात आणि अंतिम स्थितीतील अनुभव ‘सुखद’ होऊ लागलेत.
आसने सहजपणे करा |Go easy with your yoga asana
योगासने अचूक करण्याचे रहस्य एक आहे. आपले शरीर शिथिल, आरामदाई आणि सहज ठेवा. पतंजली योग सूत्रात नेमकं हेच सांगितलं आहे - 'स्थिरम् सुखम् आसनम्'. स्थिर म्हणजे न हलता, सुखम् म्हणजे आरामदाई सहज स्थिती. योगासन करताना तुम्ही खात्री करून घ्या की तुमचे शरीर स्थिर आहे आणि त्या स्थितीत तुम्हाला कसलीही अस्वस्थता किंवा वेदना जाणवत नाही. तुम्ही सुरुवातीलाच आसनाची आदर्श स्थिती गाठू शकला नाहीत तरी काही हरकत नाही. उदाहरणार्थ समोर वाकत करावयाचे हस्तपादासन करताना जर तुमचे हात थेट पायाच्या तळव्यांपर्यंत पोहोचू शकत नसतील आणि ते जेमतेम घोट्यांना स्पर्श करत असतील, तरीही काळजी करू नका. लक्षात ठेवा, सरावानेच परिपूर्णता प्राप्त होते. सर्वात महत्त्वाचे, आसनात शरीर स्थिर असावे त्याचवेळी ते आरामदाई स्थितीत असावे.
शिथिल होणे हीच खरी योगाची कला |Letting go is the key in Art of Yoga
योगासनाचा सराव करताना त्या आसनात शरीर आरामदाई अश्या अंतिम स्थितीत आले की पुढचे पाऊल म्हणजे प्रयत्न सोडा, शिथील व्हा आणि श्वासावर लक्ष ठेवा. पतंजली योग सूत्रात हेच विषद केले आहे, 'प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम्'. जेंव्हा पियानो सराईतपणे वाजवू लागलात तेंव्हा त्यातून सूर कसे सहजपणे निघतात, तसेच योगासने सुद्धा प्रत्येक सरावागणिक विनासायास आणि डौलदारपणे होऊ लागतात. समजा आपण धनुरासन करतोय. आसनाच्या अंतिम स्थितीत येण्यासाठी प्रारंभी तुम्हाला थोडा प्रयत्न करावा लागेल, पण एकदा तुम्ही त्या आसनात स्थिरावता, तसे आपले सारे लक्ष शरीरात निर्माण झालेल्या ताणाकडे द्या आणि दीर्घ उज्जयी श्वास घेत रहा.
योगासने करताना चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा आणि फरक पहा |Smile through yoga asana and see the difference
योगासने करत असताना तुमच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य आश्चर्यकारक फरक घडवेल. चेहऱ्यावरील स्मितहास्याची वक्ररेषा आसनातील शरीरातील सर्व वक्र डौलदार बनवते.
”मी भिंतीचा आधार घेतल्याशिवाय मी घोटा फिरवू शकत नव्हते. माझा तोलच जायचा. मग मला माझ्या श्री श्री योगा प्रशिक्षकांनी सांगितले की, ‘हा व्यायाम करताना तू आपल्या चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत राहा. मग तुला कोणत्याही आधाराची गरज पडणार नाही.’ मी तसा प्रयत्न केला आणि खरंच तसं जमून गेलं.” प्रीतिका नायर या शिबिरार्थीला स्मितहास्याचा अनुभव आल्यावर खूप नवल वाटले.
तुम्ही जे आसन करत आहात ते योग्यपणे करत आहात की नाही हे तुमच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य दर्शविते. तुमचं स्मितहास्य मावळू लागलं तर ध्यानात घ्या कि तुम्ही शरीराला गरजेपेक्षा जास्त ताण देत आहात किंवा त्या आसनात तुम्ही आरामदाई नाही आहात.
योगाभ्यास करताना आपल्या शरीराच्या मर्यादा ओळखणे उत्तम. प्रत्येकाच्या शरीराची लवचिकता आणि क्षमता वेगळी आहे. म्हणून कोणत्याही आसनात अति ताण देऊ नका. योग हा इन्स्टंट कॉफी सारखा नाहीतर तो हर्बल चहा सारखा असतो. तुम्ही चहा जेवढा जास्त उकळता तेवढा त्याचा रंग गाढा होत जातो. नियमित सरावानेच योगसाधना उत्तम बनू लागते.
<< 8 Tips to Improve Your Yoga Practice Yoga... Moving Beyond Asanas >>
(Based on inputs from Sri Sri Yoga teachers: Dinesh Kashikar and Shriram Sarvotham.)