स्नायूंना ताण देणे हा योगाचा अविभाज्य भाग आहे आणि योगी लोकांसाठी तो परमानंदाकडे जाण्याचा मार्ग आहे. तथापि त्यामुळेच योग करणाऱ्यात, वैज्ञानिकांत आणि योगाकडे संशयाने बघणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठविलेले आहे. आधुनिक विज्ञानाने मात्र योगामधील शरीराला पीळ देणे, ताण देणे आणि वाकविणे यामागील तांत्रिक विश्लेषण आणि त्याचे योगाचा सराव करणाऱ्यांना मिळत असलेले फायदे याचा संपूर्ण उलगडा केला आहे.
उतींचा ऱ्हास रोखला जातो I Preventing Tissue Degradation
आजकालच्या ऑफिस आणि तंत्रज्ञानाच्या काळात आपल्या जीवनात शारीरिक हालचाली आणि मेहनत अतिशय कमी झाली आहे. यामुळे आपले स्नायू आणि सांधे एका मर्यादेपलीकडे ताण सहन करू शकत नाहीत. जे लोक मेहनतीचे आयुष्य जगत आहेत त्यांच्या उतींमध्ये सुद्धा काठिण्य व ऱ्हासाचा धोका संभवतो. कारण वाढत्या वयानुसार शरीरात निर्जलीकरण व ताठरता वाढू लागते. स्नायूंचे तंतू आपल्या समांतर तंतूंसोबत पेशीय पातळीवर एकमेकांना चिकटत आपसात जोडले जातात. हे तंतू सांधे जोडणाऱ्या उतींसोबत एकमेकांना जोडत लवचिकता अजून कमी करतात.
स्नायूंना ताण दिल्याने उतींमध्ये वंगण तयार होण्याची क्रिया उद्दीपित होऊन निर्जलीकरणाचा वेग मंदावतो आणि पेशीय पातळीवर आपसात चिकटलेले तंतू ओढले जाऊन समांतर रित्या सहजपणे स्नायूंची पुनर्निर्मिती होऊ लागते.
लवचिकता वाढते I Adding Flexibility
स्नायूंना ताण दिल्याने त्यांची क्षमता वाढते आणि त्याचा स्नायूंच्या लवचिकतेवर कोणत्याही दुष्परिणामाशिवाय सामान्य अवस्थेतील स्नायू आपल्या लांबीच्या दीडपट अधिक ताणले जाऊ शकतात. स्नायूंच्या या ताणल्या जाण्याच्या क्षमतेमुळे अगदी कठीण आसनही ताण आणि पीळ देत केले जाऊ शकते.
म्हणून खरी क्लृप्ती केवळ स्नायूंच्या तंतूंना ताण देणे ही नसून सांधे जोडणाऱ्या उतींची लवचिकता वाढविणे ही आहे तेही स्नायूंच्या तंतूंना एकमेकाशी जोडणाऱ्या पेशी संक्षिप्त करून इतर अवयवांशी जाळे सांधत. हे सारं घडायला योग फारच उपयुक्त ठरतो आणि म्हणूनच तो लवचिकता वाढविणारा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
तणाव कमी होतो I Releasing Tension
योगामुळे शरीर लवचिक होतेच पण इतरही अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या शरीरातील विषद्रव्ये आणि मनातील तणाव दूर सारले जातात. परिणामी आपण सहजपणे गहिऱ्या ध्यानात उतरू शकतो. योगात स्नायूंना दिलेला ताण आणि लवचिकता ही अशी गुंतवणूक ठरते जी शरीर आणि मन यामध्ये परिवर्तन घडवून आणते.
जोड उतींना उत्तेजना मिळते I Stimulation of Connective Tissues
स्नायूंच्या जोड उतींनी स्नायुंच्या एकूण वस्तुमानाच्या तीस टक्के भाग व्यापलेला असतो. आणि स्नायूंचा हालचालीसाठीचा ४१ टक्के अवरोध त्यामुळेचं घडतो. योगामुळे स्नायूतंतूंना विलग होऊन एकत्रित ताकत लावण्यास, योग्य आकार देण्यास आणि कोणत्याही कृतीसाठी बळ लावण्यास अनुकूलता लाभते. जोडाच्या सांध्यांना वंगण, जलद रोगनिवारण, रक्ताभिसरणात सुधारणा आणि सहज हालचाल हे स्नायूतंतूंना ताण दिल्याने लाभणारे फायदे आहेत.
मानेच्या दुखण्यात खालील ताण देत केलेल्या तीन आसनांचा संच केल्यास आराम मिळतो.
शिशू आसन I Shishuasana
पाठदुखी आणि मानेच्या दुखण्यात वेदना कमी करण्यासोबतच या आसनामुळे मेंदूला शांतता लाभते. कुल्ले, मांड्या आणि पायाचा घोटा यांना ताण मिळतो आणि त्यामुळे ताजेतवाने वाटते.
मार्जारासन I Marjariasana
योग शिकायला सुरुवात या आसनाने केली जाते. या आसनाने पाठीचे मर्दन तसेच पाठीच्या कण्याला लवचिकता लाभते. यामुळे पचन सुधारते.
नटराजासन I Natarajasana
या आसनामुळे स्नायू लवचिक होतात तसेच तृप्ती आणि परमानंदाचा अनुभव येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही भगवान शिवाची एक नृत्यमुद्रा आहे. ते शिवतत्व सर्वत्र अनुभवायला हवे.
म्हणून असे म्हटले जाते की योगासनातील शरीराला दिल्या जाणाऱ्या पीळ व ताणामुळे, तणाव आणि विषद्रव्यांच्या निचरा होऊन शरीर आणि मन स्वस्थ राखण्यास मदत होते. परिणामी मन प्रसन्न, केंद्रित होऊन चांगलेपणाची अनुभूती येते.