जर तुमच्याकडे खुश ठेवण्यासाठी कुणी असेल तर तुम्ही सज्ज असाल व आनंदी असाल. पण जर तुमचे ध्येय फक्त स्वत:ला खुश ठेवणेच असेल तर नक्की नैराश्य येणार.
माझ्याबद्दल काय? माझ्याबद्दल काय? हा नैराश्याचा मंत्र आहे. परंतु याउलट आपण सर्वांनी एक सकारात्मक वातावरण तयार करण्याची जबाबदारी घ्यायला हवी.
सेवा करण्याचा दृष्टीकोण वृद्धींगत करणे हेच नैराश्यातून बाहेर येण्यासाठी सहाय्यक ठरू शकते. ‘मी समाजासाठी काय करू शकतो?’ या उदात्त हेतूमुळे संपूर्ण जीवनाचा उद्देश्य उंचावल्याने ‘माझे कसे होणार?’ च्या गोंधळातून प्रत्येक जण बाहेर येऊ शकतो. असे समाज, जेथे सेवा, त्याग आणि सामाजिक सहभागाची मुल्ये अंगभूत असतात , तेथे नैराश्य, उदासिनता आणि आत्महत्या यांना थारा नसतो.
जीवन निरस आहे असे वाटणे, हे नैराश्याचे लक्षण आहे. आयुष्यात सारे काही संपले आहे, निरस झाले आहे, काहीही नाही, पुढे जाण्यासारखे काही नाही, असे जीवनात वाटणे म्हणजे जीवनात नैराश्य येणे.
जेंव्हा उर्जेचा स्तर खालावतो तेंव्हा तुम्हाला नैराश्य येते. जेंव्हा प्राणशक्तीचा स्तर उच्च असतो तेंव्हा तुम्ही आनंदी असता. योग्य श्वसन प्रक्रिया, ध्यान आणि योग्य, प्रेमळ व्यक्तीच्या सानिध्यामुळे प्राणशक्तीचा स्तर उंचावू शकतो.
मोठी काळजी करा
जरा आपल्या आयुष्याकडे पहा. या पृथ्वीवर जर ८० वर्षे जगणार असाल तर त्यातील ४० वर्षे झोपणे आणि विश्रांती घेणे यात गेलेत. दहा वर्षे बाथरूम आणि टॉयलेट मध्ये गेलेत. आठ वर्षे खाण्या पिण्यात तर बाकी दोन वर्षे ट्रॅफिक जाम मध्ये गेलेत. आयुष्य झपाट्याने जात आहे, आणि अचानक तुम्ही जागे होता आणि कळते की हे सारे स्वप्नवत आहे. जेंव्हा हा विशाल दृष्टीकोण प्राप्त होईल तेंव्हा या छोट्या छोट्या बाबी आपणास त्रास देणार नाहीत.
आपण चिंता करीत असलेल्या गोष्टी अतिशय छोट्या आहेत. वैश्विक तापमान कां निर्माण होतेय, याचा आपणास त्रास होतोय काय?
अनंताकडे असणारी आपली दृष्टी अस्पष्ट करण्यासाठी धुळीचा एक कण देखील पुरेसा होतो. त्याचप्रमाणे आपल्या आंतमध्ये अनंत खजिना आहे परंतु मनातील छोट्या छोट्या गोष्टी आपणास त्रासदायक ठरतात.
पण जेंव्हा आपला दृष्टीकोण विशाल बनतो तेंव्हा छोट्या समस्या या आव्हाने वाटतात. मोठ्या समस्यांबाबत विचार करायला सुरु कराल तर जग एक क्रीडांगण वाटू लागेल. जबाबदारीची जाणीव येईल आणि ज्ञान प्रकट होऊ लागेल, आणि जग सोडताना येणाऱ्या पिढीसाठी हे जगत आणखी चांगले बनवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करू लागाल.
जेंव्हा जीवनात काही अर्थ नाही असे वाटू लागते तेंव्हा आंतमध्ये एक रिक्तपणा येऊन तुंम्ही निराश होऊ लागता. साऱ्या जगभरात ही मोठी समस्या आहे. इंग्लंडमध्ये लोकसंख्येच्या १८% लोक एकाकीपणा आणि औदासिन्याचे शिकार आहेत. या समस्येला तोंड देण्यासाठी त्यांच्याकडे एकाकीपणाचा मंत्री आहे.
वर्ल्ड इकोनॉमिक फोरमने नुकतेच जाहीर केले आहे की औदासिन्य या मानसिक आजाराचा मोठा परिणाम या पृथ्वीवर झाला आहे. व्यापारी समुदायाला याची जाणीव होत आहे आणि हे स्वागतार्ह लक्षण आहे.
हल्ली तरुणांमध्ये औदासिन्य असण्याचे मुख्य कारण आहे आदर्शवादाचा अभाव. एकतर या स्पर्धात्मक जगाला घाबरलेल्या वा दिखाऊपणामुळे अति उत्तेजित झालेल्या या मुलांचे जीवन अर्थहीन बनले आहे. त्यांना हवे आहे प्रेरणास्थान. अध्यात्मिकता ही प्रेरणा आहे ज्यामुळे आत्मिक ऊर्जा उच्च राहू शकेल.
खिन्नतेशी झुंजा
आक्रमकतेमुळे नैराश्याला प्रतिबंध लागू शकतो.झुंजण्याच्या आवेशाच्या अभावामुळे नैराश्य निर्माण होऊ लागते. उर्जेचा अभाव म्हणजे नैराश्य. क्रोध आणि आक्रमकतेमुळे ऊर्जेला खीळ बसते. भगवत गीतेमध्ये जेंव्हा अर्जुन निराश झाला होता , तेंव्हा कृष्णाने त्याला लढण्यासाठी प्रवृत्त केले होते, मगच अर्जुनामध्ये चेतना पूर्ववत आली. तुम्ही निराश झाला असाल तर ध्येयासाठी लढा, कोणत्याही ध्येयासाठी लढा. पण आक्रमकता जर एका प्रमाणापेक्षा जास्त झाली तर त्यामुळे देखील नैराश्य येते. हेच सम्राट अशोकाच्या बाबतीत घडले, ज्याने कलिंगचे युद्ध तर जिंकले परंतु नैराश्य आले. त्याला बुध्दांना शरण जावे लागले.
ज्ञानी ते आहेत जे आक्रमकता किंवा नैराश्य यामध्ये अडकत नाहीत. योगींसाठी ही सुवर्णरेखा आहे. जागे व्हा आणि जाणून घ्या की तुम्ही योगी आहात.
ध्यान, सेवा, ज्ञान आणि शहाणपण यांच्याद्वारे आत्मिक उन्नती करणे म्हणजेच अध्यात्मिकता होय. अध्यात्मिकतेमुळे नैराश्यातून बाहेर येता येऊ शकतो.
पूर्वीच्या काळी तरुणांपुढे काही जाणून घेण्याचा उद्देश होता. शोधण्यासाठी सारे जग होते. प्राप्त करण्यासाठी ध्येय होते. सध्याच्या तरुणांना ते अनुभव विना सायास हाताच्या बोटावर मिळत आहेत. इंटरनेटमुळे जगातील सर्व गोष्टींचे अनुभव त्यांना मिळत आहेत. लहान मुले देखील त्यांनी जणू पूर्ण जग पाहिल्याप्रमाणे ती बोलू लागली आहेत..
त्यांचे मन आणि इंद्रिये हाताळू शकणार नाहीत त्या पेक्षा जास्त अनुभव त्यांना मिळतात, मग जलद गतीने त्यांचा सर्वातून भ्रमनिरास होतो. जर ते योग्य मार्गावर असते तर ते खूप काही शोधू शकले असते, आणखी सर्जनशील बनले असते. जर त्यांना योग्य दिशा दिली नाहीतर त्यांच्या लहानपणातच ते आक्रमक आणि नैराश्यग्रस्त होऊ शकतात..
अध्यात्मिकतेचा हलकासा स्पर्श, मूल्याधारित शिक्षण आणि मानवी मुल्यांची पेरणी मुळे सारी गोष्ट पलटून खूपच सकारात्मक परिणाम येतील. जर हे नसेल तर बहुतेकवेळा तरूण पिढी व्यसनाधीन होते. आक्रमकता, नैराश्य आणि समाज विघातक प्रवृत्ती हात पाय पसरू लागतात.
एकाकीपणाला आनंदामध्ये परिवर्तीत करा
एकटे राहणे याला संस्कृत मध्ये ‘एकांत’ हा शब्द आहे, म्हणजे एकाकीपणाचा अंत. जोडीदार बदलून एकटेपणा संपू शकत नाही, जरी आपल्याला अधिक सहानुभूती असलेली आणि समजूतदार व्यक्ती सापडली तरीही. तो तेव्हाच तो संपू शकतो जेव्हा तुम्हाला स्वतःचा मूळ स्वभाव समजेल. केवळ अध्यात्मिक शांतीमुळे आपण नैराश्य आणि दुःखामधून बाहेर येऊ शकतो.
अंतर्गत असंतोषाला हाताळताना संपत्ती, प्रशंसा आणि बाह्य प्रमाणीकरण आणि कौतुक हे उपयोगी पडत नाही. दृढ मौन, आनंद आणि अनंताची झलक जी आपल्या आंतमध्ये आहे, जे आपले अस्तित्व आहे, यांच्याशी संधान साधूनच आपण दुःखाला निरोप देऊ शकतो. केवळ ते करायला हवे.
एखादे यंत्र असणे परंतु ते माहिती पत्रका शिवाय वापरता न येणे तेवढे उपयोगाचे नसते. अध्यात्मिक ज्ञान हेच जीवनाचे माहितीपत्रक आहे. जसे गाडी चालवायला शिकताना स्टीअरिंग, क्लच, ब्रेक इत्यादी कसे वापरावे हे शिकणे गरजेचे आहे तसेच मानसिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी आपल्या जीवन ऊर्जेची मूलतत्वे माहित असणे आवश्यक आहे. हेच प्राणायामाचे संपूर्ण शास्त्र आहे.
जेंव्हा आपली प्राण शक्ती वा जीवन ऊर्जेचा स्तर वर खाली होत असतो तेंव्हा आपली मानसिक स्थिती देखील भावनांच्या आवेगासोबत वर खाली होत रहाते. मनाच्या स्तरावर आपण मनाला हाताळू शकत नाही. फक्त सकारात्मक विचारांचा भडीमार करणे पुरेसे होत नाही आणि बर्याचदा ते पुन्हा त्याच चक्रात पडण्याचे कारण ठरते.
नैराश्य कमी करणारी औषधे सुरवातीला प्रभावकारक आहेत असे वाटते पण कालांतराने त्या प्रवृत्ती कमी न होता तो रुग्ण त्या औषधांवर अवलंबून राहू लागतो. अशा वेळी श्वासाचे रहस्य जाणून घेणे खरोखरच जीवन बदलू शकते.
सुदर्शन क्रियेसारख्या श्वसन प्रक्रिया आपली प्राण शक्ती आणि त्यायोगे मनाला स्थिर करतात. ध्यानाच्या सरावाने उमजलेले आंतरिक परिमाण आपल्याला खोलवर समृद्ध करते आणि त्याचा प्रभाव जीवनाच्या सर्व पैलूंवर हळूहळू पसरतो.
आत्महत्या म्हणजे सुटका का नव्हे
जीवन म्हणजे आनंद आणि यातना यांचा मेळ आहे. यातना अपरिहार्य आहेत परंतु त्या सोसणे ऐच्छिक असू शकते. जीवनाबद्दलचा विशाल दृष्टीकोण तुम्हाला जीवनातील यातना देणाऱ्या प्रसंगातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य देतो. हे जाणून घ्या की या जगाला तुमची खूप गरज आहे. तिच्या अनंत शक्यतांसोबत जीवन एक भेट आहे, कारण ते फक्त एकट्यासाठीच नाहीतर अनेकांसाठी आनंदाचा, सुखाचा कारंजा बनू शकते.
दुःखातून सुटका करून घेण्यासाठी लोक आत्महत्या करतात परंतु त्यांना हे समजत नाही की त्यांनी आणखी मोठे दुःख बनवून ठेवले आहे. हे म्हणजे एखादा थंडीने कुडकुडत असताना त्याने बाहेर थंडीत जाऊन अंगावरील जॅकेट काढण्यासारखे झाले. अशाने थंडी काही कमी होईल कां?
लोकांना जीवनाबद्दल खूप आसक्ती असते म्हणून ते आत्महत्या करू इच्छितात. ते आनंदाप्रती, सुखाप्रती खूप आसक्त असतात म्हणून स्वतःचा अंत करू इच्छितात. आणि मेल्यावर त्यांना मोठ्या संकटाची जाणीव होते. त्यांना वाटते की, “ अरे देवा, ही अस्वस्थता, या इच्छा यांनी माझ्यामध्ये निर्माण केलेल्या तीव्र वेदना गेल्या नाहीत. माझे शरीर तर गेले परंतु त्या यातना शिल्लक राहिल्या.”
दुःख नाहीसे करून यातनांवर मात करणे फक्त शरीराद्वारे शक्य असते. त्याऐवजी, तुम्ही तेच साधन नष्ट केले ज्याद्वारे तुम्ही दुःखापासून मुक्त होऊ शकता. जेंव्हा उर्जेचा स्तर खालावतो तेंव्हा नैराश्य येते, आणि तो जेंव्हा आणखी खालावतो तेंव्हा आत्महत्येची प्रवृत्ती वाढते. जेंव्हा प्राण शक्तीचा स्तर उच्च असतो तेंव्हा हा विचार येत नाही. जेंव्हा प्राण शक्तीचा स्तर उच्च असतो तेंव्हा आपण स्वतःशी तसेच इतरांशी हिंसक होऊ शकत नाही. योग्य श्वसन प्रक्रिया, काही ध्यान आणि सत्संग आणि प्रेमळ सहकाऱ्यांच्या सहवासामुळे ऊर्जा वाढू शकते.
ज्यांच्यामध्ये आत्महत्येची प्रवृत्ती आहे अश्यांना कोणीतरी काही श्वसन प्रक्रिया आणि ध्यान करवून घेण्याची आणि त्यांची ऊर्जा वाढवण्याची गरज आहे. दररोज दहा मिनिटे ध्यान करून पोकळ आणि रिक्त व्हा. आपल्याला तणाव आणि हिंसा मुक्त समाजाची निर्मिती करावयाची आहे, आणि त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे ध्यान. अनेकदा आपण ध्यानाला बसतो तेंव्हा आपले मन सर्वत्र भटकत राहते. अश्यावेळी मन शांत आणि प्रसन्न होण्यासाठी सुदर्शन क्रिया™ हि श्वसन प्रक्रिया आणि योगासने यांची मदत होईल.
जर तुम्हाला आत्महत्येचे विचार येत असतील तर, खालील गोष्टींकडे लक्ष द्या.
1. हे जाणून घ्या की तुमची प्राणशक्ती कमी झाली आहे, म्हणून जास्त प्राणायाम करा.
2. तुमच्यापेक्षा जास्त त्रास सहन करणारे येथे लाखो लोक आहेत. त्यांच्याकडे पहा. जेंव्हा तुमच्या यातना छोट्या वाटायला लागतील तेंव्हा तुम्ही आत्महत्येचा विचार करणार नाही.
3. जाणून घ्या की तुमची गरज आहे, तुम्ही उपयोगी आहात. जगामध्ये तुम्हाला काहीतरी करायचे आहे.
लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे विसरा. लोक आत्महत्या करतात, कारण त्यांना वाटते कि त्यांनी त्यांची प्रतिष्ठा आणि सन्मान गमावला आहे. कसली प्रतिष्ठा? कोणता सन्मान? तुमच्या प्रतिष्ठेचा विचार करायला येथे कोणाकडे वेळ आहे? जो तो आपल्या समस्या आणि आपल्या मनामध्ये गुंतला आहे. ते त्यांच्या मनातून बाहेर येवू शकत नाहीत. मग त्यांना कोठे तुमच्या बद्दल विचार करायला वेळ असणार? समाज आपल्या बद्दल काय म्हणतो, याचा विचार करणे निरुपयोगी आहे. जीवन हे फक्त काही भौतिक साधन संपत्ती पेक्षा खूप मोठे आहे. जीवन हे कोणाकडून तरी मिळालेल्या टीका वा स्तुती यापेक्षा खूप मोठे आहे. जीवन हे नाते संबंध वा नोकरी पेक्षा खूप मोठे आहे.
नाते संबंधांमधील अपयश, नोकरीतील अपयश आणि इच्छित साध्य न होणे हे आत्महत्येचे कारण असते. पण जीवन हे तुमच्या चेतनेमध्ये, तुमच्या मनामध्ये उठणाऱ्या छोट्या इच्छांपेक्षा खूप विशाल आहे. जीवनाला मोठ्या दृष्टीकोनातून पहा आणि स्वतःला सामाजिक वा सेवा कार्यामध्ये गुंतवा. सेवेमुळे मनुष्य विवेकी राहून मानसिक नैराश्यापासून दूर राहतो.
या लिखाणाचा उद्देश्य व्यावसाईक वैद्यकीय सल्ला वा निदान वा उपचार यांना पर्याय हा नाही. कोणत्याही वैद्यकीय आजारांच्या प्रश्नांसाठी आपले डॉक्टर वा प्रशिक्षित आरोग्य तज्ञ यांचा नेहमी सल्ला घ्या.