आपणास कोणत्या गोष्टीचा राग येतो ? लोक, घटना, परिस्थिती ? आपण वस्तूंवर रागावू शकत नाही. त्यामुळे आपला राग लोक आणि परिस्थितीवर असतो. या लोकांमध्ये आपण देखील सामील आहात – एकतर आपण स्वत:वर रागवलेले असता किंवा दुसर्या कोणावर तरी.
कशाच्या तरी कमतरतेमुळे आपणास राग येतो. आपणास जर काही करायचे असेल आणि आपण ते करू शकत नसाल तर त्या असमर्थ असण्याच्या भावनेमुळे आपणास संताप येतो.
जर आपण सक्षम आणि खंबीर असलो तर आपणास कां राग येईल ? आपण मुंगीवर किंवा माशीवर कधी रागवत नाही. आपल्यापेक्षा खालच्या पातळीवरच्या व्यक्ती किंवा वस्तूवर आपण कधीही रागवत नाही. आपण नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ किंवा बलवान व्यक्तीवर रागावतो. जेंव्हा आपल्याला कोणतीही गोष्टआपल्या क्षमतेच्या पलीकडे आहे असे दिसून येते, तेंव्हा आपल्याला राग येतो. जेंव्हा कोणीतरी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही तेंव्हा आपल्याला राग येतो. आपल्याला जेंव्हा वाटते की आपले शब्द आपल्यापेक्षा खूपच जास्त महत्त्वाचे आहेत, तेंव्हा राग निर्माण होतो. त्यामुळे जेंव्हा राग येतो, तेंव्हा खूप त्रास होतो.
राग लगेच शांत होणे महत्त्वाचे आहे.
वागणे आणि बोलणे हे उत्तमच असले पाहिजे हा आग्रह बहुतेक वेळा राग येण्याचे कारण असते. उत्तम आणि परिपूर्ण वागणे हे जवळजवळ अशक्य आहे. वागण्यात फक्त ९५ टक्के परिपूर्णता शक्य आहे. पण, उत्तम बोलणे आणि उत्तम मनःस्थिती १०० टक्के शक्य आहे.
आपल्याला किती वेळा राग येतो ? जेवढी आपली ताकत कमी असते किंवा जितके आपण दुबळे असतो, तितक्या जास्त वेळा आपणास राग येत असतो. आपण जेवढे जास्त खंबीर असू, तेवढी आपली रागवण्याची प्रवृत्ती कमी असते. आपण याचा विचार करायची गरज आहे. आपला खंबीरपणा कुठे आहे? आपल्याजवळ तो कां नाही आहे?
दुसरा घटक आहे, दृष्टीकोन. जीवन आणि सभोवतालच्या लोकांबद्दलचे सखोल ज्ञान. हे देखील महत्त्वाचे आहे. तिसरे आहे, हव्यास किंवा लालसा – यामुळे राग निर्माण होतो. एखादी गोष्ट मिळवण्याची लालसा किती आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी राग येण्यामागचे कारण एखादी तीव्र इच्छा असते. आपण हे समजायला हवे. जर राग हा आपल्या समाधानासाठी, तीव्र इच्छांसाठी किंवा अहंकारासाठी असेल तर आपली प्रतिक्रिया वेगळी असते. पण जर आपला राग करूणेपोटी असेल, त्याचा उद्देश्य सर्व व्यवस्थित व्हावे हा असेल तर गोष्ट वेगळी आहे. असा राग येणे काही वाईट नाही.
संतापाचे दुष्टचक्र तोडणे
लोक वाद घालतात, भांडतात कारण त्यांना वाटते की ते बरोबर आहेत. “मीच बरोबर आहे” या भावनेमुळे त्यांना भांडायला ताकत मिळते. जर कोणाला वाटत असेल की ते चूक आहेत तर त्यांच्यात भांडायची हिम्मत नसते.
या संकुचित “मीच बरोबर आहे” या भावनेमुळे जगात सर्वात वाईट गोष्टी घडल्या आहेत.जगातील सर्व युद्ध याच्यामुळेच झाली आहेत.
जर आपण आपला दृष्टीकोन विशाल केला आणि सत्याकडे निष्पक्षपणे पाहिले तर आपल्याला वेगळेच चित्र दिसेल. “मीच बरोबर” ही आपल्या बुद्धीतील एक कल्पना आहे. त्याच्या पलीकडेच कोणत्याही परिणामाचे खरे कारण असते. खरे आणि मूळ कारण कोणते आहे हे पाहण्यातच शहाणपणा आहे.
हे दुष्टचक्र तोडण्याचे काही तंत्र दिले आहेत
चिडलेल्या लोकांना एका फटाक्याप्रमाणे समजा.
दिवाळीत आपण फटाके पेटवतो आणि पळतो. आणि दुरून त्याची मौज पहातो. थोड्या वेळाने तो फटका विझतो. चिडलेला माणूस असाच असतो.
पण आपण फटाके घरात फोडत नाही. आणि आपली कोणतीही मौल्यवान वस्तू त्याच्याजवळ ठेवत नाही. त्यामुळे, हे पहा की कोणतीही महत्त्वाची गोष्ट चिडलेल्या माणसाच्या आसपास नाही.
रागीट लोकांशिवाय या जगात काही मजा नाही. त्यामुळे स्वतःला वाचवून, लांब राहून त्यांच्यावर लक्ष ठेवा. त्यांच्यात गुंतू नका, तर आपणास मजा येईल.
जाणीवपूर्वक रागावर मात करा
जेंव्हा आपणास आला आहे आणि आपण तो व्यक्त करत नाही तेंव्हा आपणास गुदमरल्यासारखे होते. दुसऱ्या बाजूने, जेंव्हा आपण संताप व्यक्त करतो तेंव्हा आपल्यात अपराधीपणाची भावना येते. त्यामुळे गुरूकिल्ली ही आहे की दोन्हीच्याही पलीकडे आहे.
जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायचे. जसे सजावट – केकवर वेगवेगळ्या रंगांचे व आकारांचे आयसिंग असते, तसेच आपल्या भावनांकडे केवळ एक सजावट म्हणून पहा. सजावटीमुळे मूळ पदार्थाला खरे तर काही फरक पडत नाही. तसेच, आपण आपल्या भावनांमध्ये अडकायचे नाही, अपराधी वाटून घ्यायचे नाही. हे तेव्हाच होईल जेंव्हा आपण प्रत्येक गोष्ट अधिक सजगपणे करू लागतो.
नवरात्रीच्या वेळी, आपण सत्संग करतो, आणि उपास करतो. जेणेकरून आपले मन पूर्णपणे भक्तिरसात बुडून जावे. याच पद्धतीने आपण राग आणि इतर दुर्गुणांना टाळू शकतो.
आपली आक्रमकता आवरण्यासाठी आपली ताकत वापरा.
आक्रमकता का उद्भवते? जेंव्हा आपणास वाटते की कोणीतरी आपल्यापेक्षा मोठे आहे, तेंव्हा आपण आक्रमक होतो, बरोबर? याचा विचार करा. जेंव्हा आपल्यापेक्षा कोणी खरोखरच प्रचंड मोठे असते किंवा अतिशय नगण्य असते तेंव्हा आपण आक्रमक होत नाही. पण, जेंव्हा आपणास वाटते की कोणी आपल्या बरोबरीचे आहे किंवा थोडे जास्त किंवा थोडे कमी आहे, तेंव्हा आपण आक्रमक होतो. याचे कारण असे आहे, की तुम्ही आपण आपल्या सामर्थ्याबद्दल अनभिज्ञ आहोत. जागे व्हा आणि पहा की आपण काय आहोत आणि कोणाबरोबर आक्रमक होत आहोत.
आपण डास मारण्यासाठी कधी आक्रमक होत नाही! आपणास माहित असते की तो फक्त एक डास आहे आणि त्याचे फार काही महत्त्व नाही. तसेच, आपल्या सामर्थ्याबद्दल सजग व्हा.
थोडीशी उणीव असणे मनासाठी चांगले असते
परिपूर्ण असण्याची प्रचंड अपेक्षा मनात राग आणि हिंसा निर्माण करते. दोष आणि उणीवा स्विकारणे खूप अवघड जाते. कधी कधी आपण ठरवल्याप्रमाणे होत नाही. ही परिस्थितीसुद्धा प्रत्येकाला हाताळता आली पाहिजे.
दोषांसाठीही थोडी जागा ठेवणे गरजेचे आहे. त्याने सहनशक्ती वाढते. जेंव्हा सहनशक्ती जास्त असते, तेंव्हा राग कमी येतो आणि जेंव्हा राग कमी होऊ लागतो, तेंव्हा हिंसक वृत्ती राहत नाही.
प्रेमाला ज्ञानाचे कवच घाला.
आपण ज्याच्यावर प्रेम करता, जेंव्हा आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही , तेंव्हा आपण व्यथित होता. रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे आपण दुःखी होत नाही ! पण, ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे, किंवा ज्याला आपण आपले जवळचे समजतो, तो आपल्याकडे पाहून हसला देखील नाही किंवा आपल्याशी नीट बोलला पण नाही तर आपणास फार दुःख होते.
लोकांचे मन जेंव्हा दुखावते तेंव्हा ते स्वतःला अलिप्त करून घेतात, निष्ठुर होतात आणि क्रूरपणाने वागतात.
प्रेम ही अतिशय तरल आणि नाजूक भावना आहे. ती सहजपणे दुखावते आणि लगेच तिचे तिरस्कार, राग, नाराजी, कडवटपणा किंवा मत्सर या भावनांमध्ये परिवर्तन होते.
आपल्या समाजात ही नाजूक भावना विकृत होण्यापासून कशी वाचवायची ? ज्ञानाने. ते प्रेमाचे रक्षण करण्यासाठी एक कवच आहे. ज्ञानाने प्रेमाची शुद्धता टिकून राहते, आणि सर्व विकारांपासून त्याचे रक्षण केले जाते. संतांचे प्रेम नेहमी शुद्ध असते कारण ज्ञानाचे कवच कायम त्याची रक्षा करत असते.
जेंव्हा साधना अधिक गहन होऊ लागते, तेंव्हा अतिशय सूक्ष्म पातळीवर आपल्याला प्रेमाचा अनुभव येऊ लागतो.
आपल्याबाबत जे काही भूतकाळात झाले आहे , त्याबद्दल रागावणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. वर्तमानकाळातल्या एखाद्या गोष्टीबद्दल राग माना. पण रागाला रागानेच प्रत्युत्तर द्यायचे .. किती मूर्खपणा आहे ! जर कोणी पुन्हा पुन्हा तीच चूक करत असेल तर त्याला रागावू शकता. पण त्यात वाहून जाऊ नका.
आरोग्य वर्धक गुस्सा : पाण्यावर काढलेली रेषा जेवढा वेळ टिकते तेवढाच वेळ राग हा आरोग्य वर्धक राहतो. याचा अर्थ असा नाही की कोणी चुकल्यावर आपण राग व्यक्त करायचाच नाही. पण त्याच्याबरोबर वाहून जाणे हा शहाणपणा नाही. साधना कोणत्याही विकारापासून आपल्या मनाचे रक्षण करते. विकार म्हणजे आपल्याला आपल्यापासून दूर नेणारी विकृती.
जेंव्हा राग योग्य आणि गरजेचा असतो
कधी कधी राग आला आहे असे दाखवणे गरजेचे असते. रागाला एक हत्यार म्हणून फक्त दाखवण्यापुरते वापरले गेले पाहिजे. म्हणजे आपण रागावलो आहे पण आतून आपण शांत आणि स्थिर आहोत. अशा प्रकारे राग जेंव्हा दाखवला जातो तेंव्हा आपला रक्तदाब वाढत नाही, आपण थरथरत नाही आणि तप्त होत नाही.
एक आई आपल्या मुलाला सतत कोणत्या न कोणत्या तरी गोष्टीवरून रागवत असते, त्याच वेळी ती आपल्या पतीकडे पाहून हसत असते. ती रागवत पण असते आणि मिष्कीलपणाने हसत ही असते. हा राग तिच्या डोक्यात जात नाही. आणि तिच्या झोपेतही अडथळाही येऊ देत नाही. म्हणजे फक्त दाखवण्यापुरते रागवणे हे ठीक आहे.
दुसर्याच्या भल्यासाठी रागवणे ठीक आहे , पण स्वत:च्या स्वार्थी उद्देशांसाठी रागवणे योग्य नाही. त्याने फक्त आपल्यालाच त्रास होतो. दुसरी व्यक्ती आपला अपमान करते आहे म्हणून जर आपण रागावत असाल तर त्याने फक्त आपल्याला त्रास होईल, दुसर्या कोणालाही नाही. जर आपण दुसऱ्या व्यक्तीला त्रास होण्यापासून वाचवण्यासाठी रागवत असाल तर ते खरे हितकारक आहे.
“मी”, “मला” आणि “माझे” यांच्यामुळे जो राग उत्पन्न होतो त्याने फक्त वेदना आणि नैराश्य येते. जेंव्हा आपल्या लक्षात येते की एखादी व्यक्ती मूर्खपणा करते आहे आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी जेंव्हा आपण रागवतो, असा राग हा खरे तर हितकारक आहे.
भूतकाळाबद्दल मनात दाबून ठेवलेला राग
राग ही काही वेगळी ऊर्जा नाही. ती एकच ऊर्जा आहे जी वेगवेगळ्या भावनांमधून व्यक्त होते, जसे राग आणि करुणा, प्रेम व परोपकार इ.. या दोन वेगवेगळ्या ऊर्जा नाहीत. उलट, एकच ऊर्जा वेगवेगळ्या रंगांमधून व्यक्त होते. हे तशाच प्रकारे आहे की एकच वीज फ्रीज, लाईट व पंख्यात वापरली जाते.
स्वतःला असा विचार करू देऊ नका की आपण राग दाबून ठेवला आहे. जेंव्हा आपण ज्ञान मिळवाल, आपले डोळे उघडतील आणि आपण सत्य काय आहे ते देखील जाणून घ्याल, तेंव्हा आपल्या लक्षात येईल की भूतकाळातील आपला राग हा फक्त आपला मूर्खपणा आणि अज्ञान होते.
चतुराईने रागाला हाताळण्याचा मार्ग
जेंव्हा आपण राग व्यक्त करतो तेंव्हा आपणास अपराधी वाटते. जेंव्हा आपण व्यक्त करत नाही तर आपणास वाटते कि आपण राग दाबून ठेवला आहे. या दोन्हीतून बाहेर येण्यासाठी जीवनाकडे एका विशाल दृष्टीकोनातून पहा.
जर आपण जीवनाचा संदर्भ बदलला, तर आपणास जीवन हा संघर्ष आहे असे दिसणार नाही. आपल्या लक्षात येईल की या भावना तुम्हाला खरंच अडकवू शकत नाहीत किंवा आपणास अपराधी वाटायला लावू शकत नाहीत किंवा गुदमरवू शकत नाहीत. त्या फक्त एका सजावटीसारख्या आहेत. मूळ पदार्थाला सजावटीमुळे काही फरक पडत नाही. हे तसेच आहे जसे केकवर वेगवेगळ्या रंगाचे आयसिंग सजावट असते.
हिंदू पुराणामध्ये, श्री विष्णू आणि त्यांचे रागाबरोबरचे युद्ध याबद्दल एक कथा आहे. श्री विष्णूंच्या कानातील मळीपासून उत्पन्न झालेले, मधु आणि कैटभ नामक दोन राक्षस, त्यांना त्रास देत होते. मधु म्हणजे राग आणि कैटभ म्हणजे द्वेष. श्री विष्णूनी हजारो वर्षे युद्ध केले , पण ते त्यांना जिंकू शकले नाहीत.
म्हणून त्यांनी देवी शक्तीला आवाहन केले. जेंव्हा दैवी शक्ती जागृत होते. तेंव्हा राग आणि द्वेष मावळतात. पाण्याच्या मदतीने देवीने मधु आणि कैटभ यांचा नाश केला. इथे पाणी म्हणजे प्रेम. म्हणजे प्रेमाच्या मदतीने आपल्या चेतनेतील राग आणि द्वेषाचा नाश होतो. जेव्हा आपल्या अंतःकरणात शाश्वत प्रेम असते तेव्हा रागही नसतो आणि द्वेषही नसतो.
आपल्या आत्म्याचा उद्धार कसा करायचा ?
एक प्रकारचा राग आहे जो पूर्णपणे सजगतेने व्यक्त होतो. दुसऱ्या प्रकारचा राग हा अज्ञानामुळे व्यक्त होतो.
म्हणून जेंव्हा आपल्याला जाणवते की राग येऊ लागला आहे, तेंव्हा त्याआधी आपणास शरीरात काही संवेदना जाणवतात , जसे की डोक्याला किंवा डोक्याच्या मागच्या बाजूला किंवा कपाळावर मुंग्या आल्यासारखे जाणवते. किंवा मान आणि खांदे आखडल्यासारखे होतात. या संवेदनांना त्याच क्षणी ओळखणे हे एक कसब आहे. जेंव्हा आपल्याला या संवेदनांना ओळखायची सवय होते, तेंव्हा आपण रागाला सहजपणे जिंकू शकतो. त्याच्यामुळेच ध्यान खूप महत्त्वाचे आहे. राग हा फक्त ध्यानामुळे काबूत ठेवता येतो.
ध्यानाचे शास्त्र
याआधी तुम्हाला जेंव्हा राग येत होता तेंव्हा तो खूप काळ टिकायचा. जर आपण अलीकडेच ध्यान करायला सुरुवात केली असेल तर आपल्या लक्षात आले असेल की राग अजूनही येतो पण तो लगेचच निवळतो. चार ते पाच मिनिटांमध्ये राग मावळतो, हो की नाही ? जर असे असेल तर तुम्ही समजून जा की सकारात्मक मानसिकतेकडे तुम्ही एक मोठे पाऊल उचलले आहे.
पूर्वी जेंव्हा आपण ध्यान करत नव्हतो तेंव्हा आपणास आलेला राग कित्येक दिवस, महिने आणि कदाचित वर्षापर्यंत राहायचा. पण आता जेंव्हा आपण नियमितपणे ध्यान करु लागलो आहात तेंव्हा आपणास जाणवले असेल की राग फार काळ टिकत नाही. असे कां होत आहे? आता जेंव्हा आपणास राग येतो, तेंव्हा आपले लक्ष श्वासावर जाते आणि आपण आपल्या श्वासाबद्दल सजग होतो- त्यामुळे रागाला नियंत्रित करण्यासाठी मदत होते. पूर्वी केलेल्या ध्यानाच्या अनुभवामुळे मन लगेचच शांत आणि स्थिर होते आणि राग अर्ध्यातच नियंत्रित होतो. कोणतेही ध्यान कधीही वाया जात नाही.