लहान मुलांची ऊर्जा, चपळता आणि कुशलता पाहून तुम्ही किती वेळा चकित झाला आहात ? त्यांची शुद्ध आणि कल्पक बुद्धी विस्मयकारक असते. दुसर्‍याच क्षणी , तुमची डोळ्याची पापणी मिटेपर्यंत त्यांच्या याच गुणांमुळे तुमचा पारा चढलेला असतो. कारण तुम्हाला आवडो अगर न आवडो, मुले अधूनमधून त्यांचे उपजत गुण, पालकांना न आवडणाऱ्या गोष्टींमध्ये वापरतात. जसे की दुरुत्तरे करणे, थापा मारणे, वेगवेगळ्या सबबी देणे इ.

कोरोना महामारीच्या काळात मुलांनी जे खूप वेळ ऑनलाइन क्लासेस केले आहेत, त्यावेळी तुम्ही पाहिले असेल की काही नवनवीन गोष्टींमुळे त्यांचे लक्ष विचलित होत होते. क्लास चालू असताना ऑनलाइन गेम्स खेळणे, यु ट्यूबचे अपडेट्स चेक करणे, लॉग इन केले असताना धाकट्या भावंडाबरोबर खेळणे – मुले काय करतील याचा अंदाज येत नाही. ही तर त्यांची जादू आहे. आणि हे मर्यादेत असेल तर ठीक आहे.

२०-२०-२० : झटपट डोळ्यांचे व्यायाम.

खूप तास स्क्रीनला टक लावून पाहणे हे कोणालाही थकवा आणि शीण आणणारे आहे. तुमच्या मुलांना हा सोपा १ मिनिटाचा, डोळ्यांना विश्राम देणारा व्यायाम करायला सांगा. प्रत्येक २० मिनिटांनी, २० फुट दूर असलेल्या एक ठिकाणी पाहत राहताना, २० सेकंद डोळे मिचकावायचे आहेत.

उर्जेला योग्य दिशा देणारे ध्यान.

निःसंशयपणे, मुलांच्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते. पण ही ऊर्जा अशीच राहिली तर ती विध्वंसक बनते. त्यांच्या या जन्मजात उर्जेला आणि बुद्धीला एक सकारात्मक आणि चांगली दिशा मिळावी म्हणून पालक धडपडत असतात जेणेकरून मुले त्यांच्यासमोर एक योग्य ध्येय ठेवू शकतील. याच्यासाठी सगळ्यात सिद्ध आणि सोपा मार्ग आहे ध्यान.

तुम्ही तुमच्या चंचल आठ वर्षाच्या मुलाला एका जागी बसवून लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत असाल किंवा तुमच्या किशोरवयीन मुलाला अदबीने बोलायला शिकवत असाल, ध्यान हा पालक आणि मुले याच्या पिढीतील, काळाप्रमाणे अपरिहार्यपणे निर्माण होणारे अंतर कमी करण्यासाठी अतिशय सुलभ मार्ग आहे. ध्यानाच्या फायद्यांवरील कित्येक संशोधनातून असे दिसते की मुलांच्यातील (मोहक !) रानटीपणाला माणसाळण्यासाठी आणि त्यांना वागण्या-बोलण्यातील अदब आणि आकर्षकता बहाल करण्यासाठी ध्यानाची खूप मदत होते. वयाप्रमाणे कदाचित हे गुण त्यांच्यात येतीलच असे नाही.

ध्यानाचे एक संपूर्ण विश्व आहे – ज्यात ध्यानाचे फायदे, लहान आणि किशोरवयीन मुलांसाठी कमी कालावधीचे ध्यान आणि काही तंत्र आहेत ज्यामुळे ध्यान मुलांना करण्यायोग्य होईल.

तुमच्या मुलांसाठी ध्यानाचे फायदे.

ध्यानाने, मुलांचा लपलेला उपजत स्वभाव बाहेर येतो. त्यांचा हा उपजत स्वभाव शुद्ध आणि सुंदर असतो. त्यांना आनंद मिळवून देणारा असतो.त्याच्या या स्वभावात मुले शांत, निवांत आणि उत्साहात असतात. अस्वस्थ मुलाला ध्यानामुळे स्थिरता येते, निष्काळजी मूल संवेदनशील होते. बावरलेल्या मुलाला शांत करते, आक्रमक मूल सौम्य होते. म्हणून, अर्थातच, पालकांनी त्यांच्या मुलांसाठी या सहज आणि सोप्या साधनाचा फायदा घ्यायला पाहिजे, खासकरून किशोरवयीन मुलांसाठी, जी निसर्गतःच बेचैन आणि अस्थिर असतात.

या क्षणी तुमच्या मनात एक ज्वलंत प्रश्न हा असेल की “माझ्या मुलाला/किशोरवयीन मुलाला ध्यान करायला कसे बसवू ? त्याला/तिला ध्यान करायचे नाही”. म्हणून, ध्यानाचा विषय मुलांकडे सुरु करण्यासाठी आम्ही काही सोपी तंत्रे सादर करत आहोत. जी बाळकडू म्हणून मुलांसाठी उपयुक्त ठरतील. लहान मुलांपासून ८ ते १२ वर्षे वयोगटातील लहान मुले आणि १३ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुले अश्या दोन्ही वयोगटासाठी आम्ही प्रत्येक तंत्रातील थोडेफार काही बदल सुचवले आहेत.

मुलांसाठी अल्प कालावधीचे ध्यान.

1. तुमच्या श्वासावर लक्ष ठेवा, जणू काही तो तुमचा खास मित्र आहे.

लहान मुलांसाठी ध्यानाची सुरुवात करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे की, त्याना सांगायचे की डोळे मिटून हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. २-३ मिनिट श्वासावर लक्ष ठेवा. त्यांना सांगा की येणाऱ्या श्वासाला “हॅलो” म्हणा आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाला “बाय” म्हणा.

फार वेळ स्क्रीन पाहून थकलेल्या तुमच्या चेहऱ्याच्या स्नायूंना आराम द्या.

सूक्ष्म योग, हे मुलांच्या चेहऱ्याच्या ताणलेल्या स्नायूंना विश्राम देण्याचे अतिशय सोपे तंत्र आहे. जे अत्यंत गरजेचे आहे. आपले जी ज्ञानेंद्रिये दिवस-रात्र आपल्यासाठी काम करत असतात, त्यांच्याकडे आपण किती लक्ष देतो? डोळे, भुवया, कान, तोंड, हनुवटी आणि गाल यांचे व्यायाम करण्याची आत्ताच उत्तम वेळ आहे. मुलांचे क्लास सुरु होण्यापूर्वी, मुलांना उत्साहित करण्यासाठी हे हलके व्यायाम आवश्यक आहेत.

2. प्राणायामातुन ध्यानाकडे जा.

भरपूर शारीरिक मैदानी खेळ खेळल्यानंतर बहुतेक वेळा मुले थकून घरी येतात. कधी कधी त्यांची मित्रांबरोबर वादावादी झालेली असते, कधी ती उगाचच वैतागलेली असतात, कारण मुलं ती मुलंच! या वेळेस त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्या. त्यांना हात, पाय, तोंड धुवायला सांगा आणि तुम्ही त्यांच्याबरोबर बसा. त्यांच्या थकलेल्या आणि वैतागलेल्या मनःस्थितीतून बाहेर आणण्यासाठी, त्यांना डोळे मिटून थोडे दीर्घ श्वास घ्यायला सांगा.

एकदा ती स्थिर झाल्याची खात्री झाली की त्यांना भ्रामरी प्राणायाम करायला सांगा. हा प्राणायामाचा एक छान प्रकार आहे, यात ते भुंग्याच्या गुणगुणण्यासारखा आवाज करतात. त्याचे सुखदायक तरंग मुलांना शांत आणि लगेचच अंतर्मुख होण्यासाठी मदत करतात. मुलांचा कंटाळा घालवणारा दुसरा चांगला प्राणायाम म्हणजे भस्त्रिका प्राणायाम. हा प्राणायाम तुमच्या मुलाचा थकवा दूर करून त्यांच्यात उत्साह देखील निर्माण करेल.

खास टीप : मुलांना थोड्या शारीरिक व्यायामांच्या नंतर ध्यान करायला सांगा.

मुलांनी शारीरिक व्यायाम करणे अतिशय आवश्यक आहे. त्यांना मैदानी खेळ खेळायला किंवा योगासने करायला उद्युक्त करा. त्याने त्यांची शारीरिक ऊर्जा खर्च होईल आणि त्यांची बेचैनी कमी होईल. जेव्हा मुले थकलेली असतात तेव्हा ती एका जागी बसून तुमचे म्हणणे ऐकायला तयार होतात.

नोंद घ्या: ८ ते १२ वयोगटातल्या मुलांसाठी हे प्राणायाम ध्यानासारखेच आहेत. सर्व मिळून ५ मिनिटे त्यांच्याकडून हे प्राणायाम करून घ्या. १३ ते १८ वयोगटातील मुलांना ५-१० मिनिटे डोळे मिटून शांत बसून श्वासावर हलके ध्यान ठेवायला सांगा.

3. दिवसाची सुरुवात ह्या सोप्या मंत्र ध्यानाने करा.

मुलांना काही सूचनांची गरज असते. मुलांच्या मनातील असंख्य विचार हे वेगवान आणि वेगवेगळे असतात. त्यामुळे साधारणपणे त्यांचे त्यांना एकटे राहायला आवडत नाही, खासकरून १० वर्षाखालील मुलांना. तुम्हाला जाणवले असेल की अगदी शांत मुलालासुद्धा एकटे डोळे मिटून बसायला आवडत नाही. ते कदाचित त्यांना भीतीदायक वाटू शकते. या परिस्थितीमध्ये, त्यांना मंत्र सुरक्षा आणि आधार देऊ शकतो.

नोंद घ्या: ८ ते १२ वर्षाची मुले मोठ्या आणि स्पष्ट आवाजात सावकाशपणे “ओम नमः शिवाय” म्हणत २-३ मिनिटे शांत बसू शकतात. त्यांचे डोळे मिटलेले असताना ती मंत्र म्हणत असतील, ज्यामुळे त्यांचा चंचलपणा आणि बेचैनी कमी होईल. १३ ते १८ वयोगटातील मुले मनातल्या मनात “ओम नमः शिवाय” म्हणत ५-१० मिनिटे ध्यान करू शकतात.

ह्या तीन शक्तिशाली शब्दांचे फायदे काळाबरोबर अखंडपणे त्यांच्यात सामावले जातील. काही मुले बावरलेली घाबरलेली असताना स्वतःहूनच हा मंत्र म्हणू लागतील. तुम्ही भानुमती नरसिंहन यांच्या आवाजातील हा दिव्य मंत्र लावला, तर तुमच्या मुलाला ध्यान करायला मदत होईल.

4. लहान मुलांना संस्कृत श्लोक म्हणायला सांगा.

मुलांवर त्यांच्या भोवती असलेल्या वातावरणाचा खूप प्रभाव असतो – जसे की टीव्ही शो, समवयस्क आणि मित्र. ह्या सर्वांमुळे आणि मुलांच्या वयामुळे, एक काल्पनिक विश्व निर्माण व्हायला मदत होते जे कधी कधी प्रत्यक्षातील जगापेक्षा फार वेगळे असू शकते. कधीकधी, त्यांना त्यांच्या वास्तवात जगण्यास मदत करण्यासाठी ही एक संरक्षण यंत्रणा असते (त्यांना आवडत नाही) त्यांना स्पर्श न करता एक वास्तव. प्रतिकूल घटनांमुळे प्रभावित न होता, वास्तविक जीवन जगायला शिकणे याच्यासाठी काही जी परिपक्वता लागते (जी मुलांच्या आवाक्याबाहेरची असू शकते).

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की श्लोकांच्या पठणामुळे जे लयबद्ध ध्वनी आणि तरंग निर्माण होतात, त्याने आपल्यातील मधुरता (न्युरो लिंग्विस्टिक इफेक्ट) वाढते, ज्याने आपल्याला स्वस्थ आणि सकारात्मक वाटायला मदत होते.

नित्य श्लोक जे मुलांसाठी मंत्रोच्चार आहेत या तरुण मनांना आभासी जगातून मुक्त व्हायला मदत करतात, ज्यामुळे त्यांच्या स्वतःच्या वातावरण्यात त्यांना आरामदायक वाटू लागते. तुम्ही नित्य श्लोक संगीत इथे किंवा मंत्रोच्चारांचे पुस्तक इथे खरेदी करू शकता. जेव्हा तुमचे मूल ध्यान करत असेल , तेव्हा तुम्ही हया श्लोकांचे पठण करू शकता किंवा वाजवू शकता.

नोंद घ्या : ८ ते १२ वयोगटातील मुलांच्या स्पंजासारख्या मनासाठी झटपट श्लोक शिकणे सोपे असते. तुमच्या रागीट किशोरवयीन मुलांसाठी हे खूप चांगले असे सकाळचे ध्यान असू शकते. थोडक्यात आणि साधे ठेवा म्हणजे सर्व वयोगटातील मुलांसाठी तुम्हाला फायदा होईल.

खास टीप : हे थोडक्यात आणि साधे ठेवा.

२० मिनिटांचे ध्यान मुलांसाठी कंटाळवाणे आणि त्रासदायक असू शकते. जर तुम्ही त्यांना जबरदस्तीने इतका वेळ बसवून ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच विरोध होईल. पहिल्यांदा जरी तुम्ही त्यांना जबरदस्तीने बांधून ठेवू शकला (कृष्णासारखे !) तरी ती पळून जातील! (कृष्णासारखेच!). आणि वाईट हे आहे की दुसऱ्यांदा त्यांच्याकडे जाणे तुम्हाला अवघड होईल कारण ती तुमच्याबरोबर काही करायला तयारच होणार नाहीत.

त्यामुळे, सुरुवातीलाच जास्त उतावळे होऊ नका. परवलीचा शब्द आहे “थोडंसंच”. त्यांना ५-१० मिनिटे ध्यान करायला सांगा. तुम्हाला लक्षात येईल की हे छोटे ध्यान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सोपा नियम हा आहे की जितक्या वर्षाचे मूल तितक्या मिनिटाचे ध्यान. – १० वर्षाच्या मुलासाठी १० मिनिटांचे ध्यान. तुम्ही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे ७ मिनिटांचे निर्देशित ध्यान लावू शकता.

जर तुमच्या घरी मूल असेल तर ते कदाचित अजून जास्त काळ बसू शकेल , तुम्ही गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे १५ मिनिटांचे सकाळचे ध्यानाचा करू शकता.

5. “ऑरा”(आभामंडल) या निर्देशित ध्यानाचा अनुभव घ्या

तुम्हाला ताण तणावातून सहजपणे मुक्त होऊन पूर्ण उत्साही कसे होता येईल ? तुमच्या मुलाला फक्त बसायला सांगा आणि गुरूदेवांच्या सुखदायक आणि मधुर वाणीने तुमचे मूल सहज आणि अलगदपणे ऑरा निर्देशित ध्यानात जाईल. सगळ्यात उत्तम काय आहे तर कोणतेही प्रयत्न करायला लागत नाहीत. ध्यानातून बाहेर आल्यावर मुले ताजीतवानी होतात आणि त्यांचा श्वास लयबद्ध होतो.

नोंद घ्या ८ ते १२ वयोगटातील मुलांना पालकांच्या मार्गदर्शनाची खूप मदत होईल. पुन्हा, थोडक्यात आणि सोपे ठेवा म्हणजे तुमच्या मुलाला पुन्हा दुसऱ्या दिवशी ध्यान करायची इच्छा होईल. किशोरवयीन मुलांना गुरुदेवांच्या सूचनांचा फायदा होईल.

6. समूह ध्यान/ सत्संगमध्ये भाग घ्या

मुले, खासकरून, किशोरवयीन मुलांच्यात त्यांच्या मित्रांचे अनुकरण करायची वृत्ती असते. त्यामुळे, समूहात ध्यान करणे हा तुमच्या मुलाला ध्यानाची सवय लावायचा उत्तम मार्ग आहे.

८ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी तुम्ही ३० मिनिटे खेळ आणि १० मिनिटे ध्यान घेऊ शकता. सुरुवातीला तुम्हाला काही हसण्या-खिदळण्याचे आवाज येतील, काही मुले इकडे तिकडे पाहतील. पण एकदा त्यांना लक्षात आले की त्यांचे काही मित्र प्रामाणिकपणे ध्यानाचा प्रयत्न करत आहेत , तेव्हा त्यांना ध्यान करायची प्रेरणा मिळेल. आपण सवयीचे गुलाम असल्यामुळे, नियमित ध्यानाचा सराव मुलांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होईल. ते आपोआपच त्यांच्या आवडत्या उद्योगांपैकी एक बनेल.

जरा मोठी, १३ ते १८ वर्षांची मुले आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सत्संगमध्ये भाग घेऊ शकतात. सत्संग हे असे सुंदर ठिकाण आहे जिथे हसत खेळत आनंदाने ज्ञानाची देवाण घेवाण होते.

खास टीप : तुमच्या मुलाच्या मित्रांकडून तुमच्या मुलापर्यंत पोहचा.

मुले खूप संस्कारक्षम असतात, आणि बहुतेक वेळा त्यांच्या मित्रांची आणि समवयस्कांची त्यांच्यावर जास्त छाप असते. त्यामुळे तुमच्या मुलाचे मित्र जर ध्यान करत असले तर तुमच्या मुलाला सुद्धा तुम्ही तयार करू शकता. त्त्यांच्या मित्रांना ध्यान त्यांना कसे उपयुक्त ठरते याचा प्रामाणिक हिशोब द्यायला सांगा. कधी कधी, काही ध्यान करणाऱ्या मित्रांचे उदाहरण देऊनसुद्धा काम होईल. “आपण वेगळे पडू” या भीतीनेच ती तयार होतील.

7. सुलभतेने योग निद्रा निर्देशित ध्यान करा

कधी कधी, मुले खेळून एवढी थकलेली असतील की ती बसायला तयारच होणार नाहीत. अशा परिस्थितीत काय होईल जर ती झोपून ध्यान करू शकतील तर ? ते जास्त आरामदायक आणि सहज असल्यामुळे मुलांना करायला सोपे वाटते. मुले बसायला तयार नसतील तेव्हा योग निद्रा ध्यान हा उत्तम पर्याय आहे. जरी त्यांना झोप लागली तरी चालते. पुरेशी विश्रांती मिळाल्यावर ते ध्यान चालू ठेवतील. कदाचित त्यांना हे जाणवेल की झोपण्यापेक्षा, जाणीवपूर्वक विश्राम जास्त आरामदायक आहे. या ध्यानासाठी कोणत्याही वयोगटातून विरोध होण्याची शक्यता कमी आहे.

लहान मुलांसाठी ५ मिनिटांची सोपी ध्यानाची तंत्रे :

  1. डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन मोठ्याने “ओम” म्हणायला सांगा. त्याचवेळी श्वाससुद्धा बाहेर सोडला जाईल.
  2. किशोरवयीन मुलांना काहीतरी आव्हानात्मक आवडत असते. सूर्य नमस्कार त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहेत. आपण ६ फेऱ्यांपासून सुरुवात करू शकतो. आणि हळू हळू १२ फेऱ्या, १८ फेऱ्या असे वाढवत जाऊ शकतो. त्यानंतर त्यांना ५-१० मिनिटे पाठीवर झोपायला सांगा.
  3. उड्या मारणे हे मुलांच्या हालचालीचा एक भाग आहे. उड्या मारायचा आणि लंगडी घालायचा व्यायाम त्यांना करायला सांगा. आणि नंतर २ मिनिटे शांत, स्थिर बसायला सांगा.
  4. त्यांना बाहेर निसर्गात फिरायला घेऊन जा. त्यांना आकाशाकडे आणि सभोवतालच्या हिरवळीकडे टक लावून पाहायला सांगा.

किशोरवयीन मुलांसाठी अल्प कालावधीचे विशेष ध्यानाचे तंत्र

1.  “राम – ध्यान” निर्देशित ध्यान

मुलांना ध्यानात जायला मदत करणारे हे अजून एक नाविन्यपूर्ण निर्देशित ध्यान आहे. संस्कृतमध्ये “रा” चा अर्थ आहे “प्रकाश” आणि “म” म्हणजे “मी”. म्हणजे “राम” या शब्दाचा अर्थ आहे – माझ्या आतील प्रकाश. या ध्यानात “राम” या शब्दातील ध्वनीचा वापर करून सहजपणे आवाजाकडून मौनाकडे जाता येते. हे सोपे ध्यान मुलांना त्यांच्या आत खोलवर त्यांच्या अंतर्मनाशी जोडायला मदत करते.

2. हरीओम निर्देशित ध्यान

हे ध्यान शरीरातील विविध चक्रांना सक्रीय करते. आपल्या शरीरातील उर्जेच्या केंद्रांना “चक्र” असे म्हटले जाते. “ह” म्हणजे वेदना / व्यथा आणि “री” म्हणजे “दूर करणारा”. जेव्हा आपण “हरी ओम”चे उच्चारण करतो, तेव्हा आपण उर्जेचा प्रवाह शरीरात फिरवतो, त्याच्यामुळे नकारात्मक भावनांचे सकारात्मक भावनांमध्ये रुपांतरण होते. त्यामुळे जेव्हा तुमचा किशोरवयीन मुलगा ध्यानाला बसला असेल तेव्हा हे ध्यान लावा.

3. भावनांचे परिवर्तन करणारे निर्देशित ध्यान

शिखरांची उंची, दऱ्या खोऱ्यांची खोली आणि पौगंडावस्थेतील दंगेखोर मुलांना कोणी समजू शकत नाही. त्यांच्यात चांगल्या आणि वाईट गोष्टींचे सतत उतार-चढाव होत असतात. आणि प्रत्येक गोष्टीला ते अवास्तव महत्व देतात. ही खरे तर त्यांची चूक नाहीए, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाशी ते सतत जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असताना त्यांच्या वयोमानापरत्वे निर्माण होणाऱ्या होर्मोन्समुळे हे होते. हा त्यांच्या आयुष्यातील तो काळ आहे जेव्हा त्यांना शिक्षणासाठी विविध मार्ग समोर असतात, त्यांच्या भावनांचा गोंधळ उडालेला असतो आणि शरीरात प्रचंड बदल होत असतात.

गुरुदेवांच्या निर्देशित ध्यानामुळे त्यांच्या तीव्र भावनांचे परिवर्तन शांत, स्थिर आणि सकारात्मक स्थितीत होते.

4. “ब्लॉसम इन युवर स्माईल” निर्देशित ध्यान

मनापासून आलेले स्मितहास्य म्हणजे काय आहे हे मुलांपेक्षा चांगले कोण ओळखू शकेल ? या ध्यानात, तुमच्या स्मित हास्याच्या सकारात्मक प्रभावाने सर्व नकारात्मकता दूर होते. या जगात स्वतःसाठी एक जागा शोधायचा प्रयत्न करणाऱ्या तुमच्या किशोरवयीन मुलांसाठी, ज्याला कायमच चुकीचे समजले जाते, त्याच्यासाठी हे ध्यान विशेषतः उपयोगाचे आहे. गुरुदेव मुलांना अशा एका रम्य विश्वात घेऊन जातात , जिथे मुलांच्यातील जबाबदारपणा आणि समंजसपणा बहरून येतो, ज्याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल.

ध्यानानंतर लक्षात ठेवायची टीप

मुलांचे ध्यान झाल्यानंतर त्यांना एखाद्या कल्पक गोष्टीत गुंतवा, जसे चित्र काढणे.

मेंदूचा डावा आणि उजवा भाग

मेंदूचा डावा भाग विचार, तर्कशास्त्र, व्यवहार यांची जबाबदारी सांभाळतो. तर उजवा भाग कला, भावना, कल्पकता आणि अंतर्ज्ञान यांच्यासाठी जबाबदार आहे. ध्यानामुळे या दोन्ही भागांचा समन्वय साधला जातो. म्हणजे तुम्ही एकाच वेळी कल्पक आणि बुद्धिमान दोन्ही असू शकता !

ध्यान झाल्यावर मुले त्यांच्या मनातील गोंधळातून बाहेर येतात आणि त्यांना त्यांच्या कल्पनाशक्तीची जाणीव होते. काहीजण चित्र काढतात. बघा, तुमचे बालक त्यांच्यापैकी आहे का ! असेल तर तुम्हाला ही गोष्ट त्यांच्या वेळापत्रकात आणण्यासाठी जोर लावायला लागणार नाही आणि ध्यानाचा सराव करण्यासाठी सतत आठवण करून देत बसायला लागणार नाही. त्यांचे त्यांनाच ते करायची इच्छा होईल.

दुसरा ध्यानाचा खूप मोठा फायदा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुमचे परस्परसंवाद हे वादावादीशिवाय होत आहेत. तुमच्या मुलांबरोबर तुमचे संवाद आणि संबंध पहिल्यापेक्षा जास्त दृढ होतील. अत्यंत मौल्यवान फायदा – बरोबर ना ?

मुलांचे ताण तणाव, चिंता, भीती दूर करण्यासाठी जर तुम्ही काही शिकायला सहज आणि सोपे तंत्र शोधत असाल , तर ऑनलाईन उत्कर्ष योग (८ ते १३ वर्षाच्या मुलांसाठी) आणि ऑनलाईन मेधा योग (१३+ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी) ही शिबिरे आहेत. इथे हसतखेळत मजेशीरपणे मुलांना शिकवले जाते. हे अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने तयार केलेले प्रोग्राम मुलांचे नैसर्गिकपणे परिवर्तन घडवून आणतील.

श्रेया चुघ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षिका यांनी लिहिलेल्या लेखाच्या आधारे.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *