कॉर्पोरेट जगतात जसजसा काळ कठीण होत आहे, तसतसा अनेकांना त्याचा त्रास जाणू लागला आहे. ताणतणावाचा आपल्या विचारांवर, जाणीवांवर, वागण्यावर व एकूणच आपल्या जीवनावर परिणाम होतो. ताणतणाव तसाच राहु दिल्यास आपल्या जीवनावर त्याचे भयंकर व दुःखद परिणाम होतात. मग ताण तणावयुक्त जीवनाची मोठी किंमत चुकविल्याशिवाय यशस्वी कसे होता येईल? असा प्रश्न आजकाल सर्वजण विचारत आहेत. याचे उत्तर अगदी सरळ व सोपे आहे.
हे सायकल चालवण्यासारखे आहे
सायकल चालवण्याचे गुपित काय आहे?
समतोल! मध्यभागी राहणे , उजवीकडे किंवा डावीकडे तोल जाऊ न देता. जेव्हा तोल एका बाजूला जाऊ लागतो , तेव्हा तुम्ही त्याला परत मध्यभागी आणता. जेव्हा तुमचा तोल जातो तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होतो. त्याकडे लक्ष द्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका; त्याला मान्य करा व पुन्हा समतोलात या. जेव्हा जेव्हा तुम्ही जीवनातील कोणत्याही गोष्टीचे संतुलन गमावता, तेव्हा तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका आणि पुन्हा केंद्रस्थानी या.
जीवनातील कोणत्याही गोष्टीशी चिकटून न राहता किंवा प्रतिकूल न होता समतोल राखण्यातच यशाचे खरे रहस्य आहे.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
कायाकल्पाकडे लक्ष द्या
प्रथम काम आणि कायकल्प संतुलित करा. आपल्या आहाराची व व्यायामाची काळजी घ्या. ध्यान आणि विश्रांतीसाठी वेळ काढा. आजकाल कामाच्या ठिकाणी दुपारी जेवण आणि ध्यान एकत्र करण्याची शिफारस केली जाते. जेव्हा कामाच्या ठिकाणी सर्वजण एकत्र बसून काही मिनिटे ध्यान करतात आणि मग एकत्र जेवण करतात, तेव्हा त्यांना ताजेतवाने वाटते आणि ते दिवसाच्या उत्तरार्धात सकाळ सारख्याच ऊर्जेने काम करू शकतात.
एखादा कला किंवा छंद जोपासावा
दुसरे म्हणजे एखादा छंद किंवा कला यात रस घ्या. कॉर्पोरेट विश्वात तुम्ही तार्किक विचार, नियोजन, विश्लेषण इत्यादी सारख्या डाव्या मेंदूच्या क्रिया कलापांनी भारलेले आहात. त्यामुळे तुम्हाला उजव्या मेंदूच्या क्रिया कलापांसह डाव्या मेंदूच्या क्रियाकलापांमध्ये संतुलन राखणे आवश्यक ठरते. चित्रकला, संगीत, कविता, किंवा इतर कोणतेही सर्जनशील आणि मनोरंजक क्रियाकलाप उजव्या मेंदूला सक्रिय करतात. जेव्हा मेंदूचे दोन्ही गोलार्ध संतुलित असतात , तेव्हा तुम्ही उच्च दर्जाची स्पष्टता, सर्जनशीलता, उत्पादकता, कार्यक्षमता आणि विश्रांती अनुभवू शकता.
जीवन आणि कामाचे संतुलन
तिसरे म्हणजे तुमचे काम, व्यवसाय व जीवन यात समतोल साधणे. तुमच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. जर तुमचे तुमच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असेल तर ते तुम्हाला खटकते. जर तुम्ही सामाजिक बांधिलकीकडे दुर्लक्ष केले असेल तर ते तुम्हाला खटकते. जर तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत असाल तर ते तुम्हाला खटकते. जर तुम्ही तुमच्या अध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत असाल तर तेही तुम्हाला खटकते. त्यामुळे जे तुम्हाला खटकत असेल , तेथून केंद्रस्थानी परत या.
सेवेने तणाव घालवा
चौथे म्हणजे सेवा (सेवा कार्य) करा. आपल्या सभोवतालच्या लोकांना मदत करा. तणावावरील हा सर्वोत्तम उपाय आहे. तुम्ही समाजासाठी योगदान दिले पाहिजे. जेव्हा तुम्ही एखादे सेवेचे व दयेचे काम करता , तेव्हा तुम्हाला तात्काळ एक आंतरिक समाधान वाटते.
अपूर्ण परिपूर्ण करा
शेवटी अपूर्णतेसाठी जागा तयार करा. दुसऱ्यांच्या काही उणीवा व आपल्या स्वतःच्या उणीवांचाही स्वीकार करा. त्यामुळे तुम्हाला धीर मिळेल. हे तुमच्या घरातील त्या जागेसारखे आहे जेथे तुम्ही कचरापेटी ठेवता. तुमचे बाकीचे घर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे.