शिवाने धारण केलेल्या चिन्हांचा मतितार्थ:
१. चंद्र: ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते मनोभावनांद्वारे व्यक्त होत असते. चंद्रकला हे त्याचेच द्योतक आहे.
२. नाग हा सजगतेचे प्रतिक आहे. शिवाच्या गळ्यातील नाग चेतनेची सजगता दर्शवतो.
३. त्रिशूल: शिव तत्व जागृती, स्वप्नावस्था आणि निद्रावस्था यापेक्षा श्रेष्ठ परंतु या तिन्ही अवस्थांना धारण केलेले आहे, याचे त्रिशूल हे प्रतिक आहे.
४. त्रिनेत्र: सजगता, ज्ञान आणि शहाणपणा हे त्रिनेत्राने दर्शवतात.
५. डमरू. ब्रम्हांडामधील प्रत्येक गोष्ट निर्माण होते आहे, लय पावत आहे पुन्हा निर्माण होत आहे. ही निर्मितीची प्रक्रिया आहे. डमरू याचेच प्रतिक आहे.
६. नंदी: नंदी म्हणजे धर्म, सत्य, योग्य निवड. शिवाने नंदीवर सवारी केली आहे. जेंव्हा तुम्ही सत्यासोबत असता तेंव्हा ईश्वरी तत्व तुमच्या सोबत असते.
शिवाने डोक्यावर धारण केलेल्या चंद्रकोरीचे महत्व:
चंद्र मनाचे द्योतक आहे आणि मनाचे अस्तित्व संपणे म्हणजे शिव तत्व. मनाचे अस्तित्व नसताना “ती” अवस्था कशी वर्णन करू शकतो किंवा अनुभवू शकतो? काहीही समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी मनाची गरज असते. ”निर्मनावस्था, अनंत चेतना” अनुभवण्यासाठी देखील अल्पश्या प्रमाणात मनाची गरज आहे. अव्यक्ताच्या अनुभूतीसाठी लागणाऱ्या त्या अल्प मनाचे प्रतिक शिवाच्या माथ्यावरील छोटीशी चंद्रकोर आहे.
ज्ञान हे मनापेक्षा श्रेष्ठ असले तरी ते मनोभावनांद्वारे व्यक्त होत असते.चंद्रकला हे त्याचेच द्योतक आहे.
भगवान शिवाच्या डमरूचे महत्व:
डमरू हा विश्वाचे प्रतिक आहे जेथे सतत निर्मिती लय आणि पुन्हा निर्मिती सुरु आहे. ही निर्मितीची प्रक्रिया आहे.
तुमच्या हृदयाचे ठोके पाहिलेत, ते देखील सरळ रेषेत नसतात तर एका तालात ते वर खाली होत असतात. संपूर्ण विश्व तालाशिवाय काहीही नाही, येथे ऊर्जा निर्माण होते आणि परत निर्माण होण्यासाठी लय पावते. डमरू याचे प्रतिक आहे. डमरूचा आकार पहा नां, मोठ्यापासून छोटे होऊन पुन्हा मोठा होतो.
डमरू ध्वनीचे देखील प्रतिक आहे. ध्वनी ताल आणि ऊर्जा दोन्ही आहे. संपूर्ण विश्व ताल आणि मंडलाकार उर्जेशिवाय काहीही नाही. भौतिकशास्त्र देखील हेच सांगते की संपूर्ण विश्व तालाशिवाय काहीही नाही. निव्वळ अद्वैत लाट आहे. डमरू विश्वाचा अद्वैत भाव दर्शवतो.
भगवान शिवाच्या गळ्यातील नागाचे महत्व:
निव्वळ चेतनेची पोकळी असणे, कोणतीही कृती नसून केवळ सजगता असणारी अवस्था म्हणजेच शिव, म्हणजेच समाधीवस्था. या अवस्थेची ओळख व्हावी म्हणून शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे. नाग हा या सजगतेचे प्रतिक आहे.
ध्यानावास्थेमध्ये व्यक्तीचे डोळे बंद असतात मात्र ती व्यक्ती झोपलेली नसते तर दक्ष, सजग असते. चेतनेची ही स्थिती दर्शवण्यासाठी शिवाच्या गळ्याभोवती नाग आहे.
भगवान शिवाच्या त्रिशुळाचे महत्व.
त्रिशूल चेतनेच्या तीन स्थिती: जागृत, स्वप्न आणि निद्रावस्थाचे प्रतिक आहे. तसेच ते सत्व, रजस आणि तमस गुणांचे प्रतिक आहे. शिवाने त्रिशूल धारण केले आहे म्हणजे तो या तिन्ही जागृती, स्वप्न आणि निद्रावस्थेपेक्षा श्रेष्ठ असून या तिन्ही अवस्था त्याने धारण केल्या आहेत.
ईश्वरी तत्व त्रिगुणांपेक्षा श्रेष्ठ असून हे त्रिगुण त्याने धारण केले आहेत.
शूल म्हणजे समस्या, दुःख. त्रिशूल म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या, दुःखांचे निराकरण.
जीवनात तीन यातना आहेत.
१. आधिभौतिक (शारीरिक),
२. अध्यात्मिक,आणि
३. आदिदैविक.
या सर्वांतून मुक्त करणारे म्हणजे त्रिशूल जे शिवाने आपल्या हातात धारण केले आहे.
भगवान शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहणाऱ्या गंगा नदीचे महत्व
गंगा म्हणजे ज्ञान जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते. मस्तक हे ज्ञानाचे प्रतिक आहे.
हृदय प्रेमाचे प्रतिक आहे.
गंगा प्रेमाचे प्रतिक असती तर ती शिवाच्या हृदयातून निघाली असती. परंतु ती तर मस्तकावरून, जटेतून निघाली आहे, म्हणजेच ती निव्वळ ज्ञानाचे प्रतिक आहे.
ज्ञान हे मुक्त, स्वतंत्र आणि शुद्धी करणारे असते. ही ज्ञानाची वैशिष्टे आहेत. ज्ञान हे प्रवाही असते. म्हणून गंगेने, ज्ञानाने शिवाच्या मस्तकावरून, जटेतून वाहत रहाणे क्रमप्राप्त आहे.
भगवान शिवाच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व:
तिसरा डोळा दक्षता आणि सजगतेची निशाणी आहे.
शिवाच्या नील वर्णाचे महत्व :
निळा रंग आकाशाचे द्योतक आहे. आकाश सर्वव्याप्त, अनंत असून असीम असते. निराकार आहे. शिव तत्वाला देखील आकार नाही, ती कोणी व्यक्ती नाही. त्या अथांग, अनंत, अनाकलनीय ईश्वरी तत्वाला लोकांना आकलनीय करण्यासाठी प्राचीन ऋषींनी हा आकार दिला आहे.
ज्ञान देखील निराकार असून ते विश्वातील अणू रेणूमध्ये प्रसवत असते.
शिव तत्व म्हणजे समस्त विश्व भरून उरले आहे.
शिव लिंगाचे महत्व:
लिंग म्हणजे ओळख. सत्य काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचे प्रतिक. जे दिसू शकत नाही मात्र ज्याच्यामुळे आपण इतरांना ओळखू शकतो ते म्हणजे लिंग.
एक बाळ जन्माला येते, ते मुलगा आहे कि मुलगी, हे कसे कळते? शरीराच्या निव्वळ एका अवयवामुळे ते शरीर मुलाचे आहे कि मुलीचे ते कळते. त्या जननेन्द्रीयाला देखील लिंगम म्हणतात.
तद्वत, आपण निर्मितीच्या ईश्वराला कसे ओळखणार? तो तर आकारहीन, निराकार आहे. मग त्याला ओळखण्यासाठी काहीतरी प्रतिक हवे नां? असे एकच प्रतिक ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोन्ही ओळखले जाईल, समस्त ब्रम्हांडाला सर्वव्यापी परंतु निराकार ईश्वराला जाणण्याचे प्रतिक शिवलिंग होय.
शिवलिंग प्राचीन नव्हे अतिप्राचीन आहे. शिवलिंगाद्वारे आपण साकाराकडून निराकाराकडे जातो. विश्व आणि विश्वनिर्माता हे एकच आहेत यांचे ते द्योतक आहे. शिव आणि शक्ती ही दोन निर्मितीची तत्वे आहेत. सुप्त, अव्यक्त आणि चैतन्यदायी व्यक्त यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे शिवलिंग. शिवलिंग म्हणजे निव्वळ शिव तत्व नाहीतर सर्वोच्च चेतनाशक्तीचे परिपूर्णत्व.
भगवान शिवाचे वाहन,नंदीचे महत्व:
पूर्वीपासून सर्वत्र बैल, नंदी सदाचरणी, धर्माचे प्रतिक म्हणून सुपरिचित आहे. भगवान शिवाचे वाहन नंदी आहे याचा मतितार्थ हाच आहे की, जेंव्हा तुम्ही सदाचरणी, सत्याचरणी असता ती अनंत आणि भोळी भाबडी चेतना आपल्या सोबत असते.
शिव तांडवाचे महत्व:
समस्त ब्रम्हांड हे विशाल चेतनेचे, शिव तत्वाचे नृत्य आहे. त्या विशाल चेतनेच्या नृत्यातून ती लाखो करोडो सजीवांमध्ये प्रकट झाली. हि अनंत निर्मिती म्हणजे शिवाचे तांडवच आहे, हे विश्व शिवाचे स्थानच आहे.
शिवाचे निवास स्थानं:कैलास
शिवाचे निवास स्थान कैलास पर्वत आणि स्मशान आहे.”कैलास“ म्हणजे जिथे निव्वळ उत्सव असतो, आणि “स्मशान“ म्हणजे जिथे रिक्तपणा आहे. दिव्यत्व रिक्तपणा तसेच उत्सव असेल तेथेच पहायला मिळते. रिक्तपणा आणि उत्सव आपल्या प्रत्येकामध्ये आहे.
“ॐ नमः शिवाय “ चे महत्व:
ओम नमः शिवाय अत्यंत परिणामकारक मंत्र आहे. तो तुमच्या अंतर्गत ऊर्जा निर्माण करतो तसेच वातावरण शुद्धीचे कार्य करतो. मंत्रांमध्ये असे ध्वनी असतात जे आपली चेतना ऊर्ध्वगतीला नेतात.
ओम नमः शिवाय हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण “न”, ”म“, ”शि“, “वा“, “य“ हे शब्द पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंच महाभूतांचे प्रतिक आहेत.
ॐ हा या ब्रम्हांडाचा ध्वनी आहे.ॐ म्हणजे शांती आणि प्रेम.
म्हणून जेंव्हा या पंच महाभूतांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद असतो तेथे आनंद, परमानंद असतो.
मंत्रांची शक्ती ग्रहांच्या श्रेष्ठ आहे. ग्रहांचे विपरीत परिणाम ॐ नमः शिवायच्या जपाने नष्ट करू शकता.