शिव काय आहे ? I What Is Shiva?



शिव काय आहे ?

शिव कोणी व्यक्ती नाही तर ती समस्त सृष्टी आहे.

शिव आकाश तत्व आहे,चेतना आहे.

ज्यातून सर्व निर्मिले,जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्यात सर्व विलीन होईल,तो शिव आहे.

शिव तत्वातून तुम्ही अलग होऊ शकत नाही कारण ते सर्व ब्रम्हांडाचे प्रतिक आहे.

श्री.श्री.

 

शिव-सर्व निर्मितींचा निर्माता

शिव शब्द ‘श’, ’ई‘ आणि ’व‘ असा विभागाला जातो.

  • श म्हणजे शरीर,
  • ई म्हणजे ईश्वर / प्राण शक्ती , आणि
  • व म्हणजे वायू / गती.

शिव म्हणजे प्राण शक्ती आणि गतीयुक्त शरीर.

शिव मधून ई जर काढून टाकले तर शव होते. म्हणून जे ‘शिवतत्वासह’ आहे ते शिव आणि त्याच्याशिवायआहे ते शव.

म्हणून शिव तत्व पवित्र, अव्यक्त आणि सर्वसमावेशक आहे-ब्रम्हांडाची चेतना, प्राणशक्ती. शिव तत्व जाणून घेणे

म्हणजे परमानंद.


शिव कोण आहे?शिव तत्व काय आहे?

श्री श्री : तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ’शिव काय नाही आहे? शिव कोणी व्यक्ती, कोणता आकार आहे कां ? तो कोठेतरी कोणीतरी बसला आहे? नाही. शिव म्हणजे समस्त ब्रम्हांड. ब्रम्हांडामधील चराचरामध्ये तोच आहे.

शिव तत्वाच्या तीन स्थिती आहेत:

 

. अरूप-निराकार,

२. रूप अरूप-निराकारातून आकार उत्पन्न होणे    आणि

  ३. सरूप-साकार

उत्पतीपूर्व, उत्पती सुरु असतानाची आणि उत्पती म्हणजे शिव.

शिवाला देह नाही. मुळात तो कोणी व्यक्तीच नाही. भावी पिढीला ती अगाध आणि अनंत चेतना समजावी म्हणून तिला त्यांनी आकार दिला गेला. नाहीतर शिव तत्व निराकार आहे.

ज्यामधून सर्वांची निर्मिती होते, जो सर्वांचे पालन पोषण करतो आणि ज्याच्यामध्ये सर्व विलीन होणार आहे, ते शिव तत्व होय. शिव आकाश तत्व, चेतना आहे. तुम्ही कधीही शिव तत्त्वातून अलग होऊ शकत नाही कारण शिव तत्व ब्रम्हांडातील अति उत्कृष्ट आहे. शिवाचे शरीर निळ्या रंगात दाखवले आहे कारण अनंताला सामाऊन घेणाऱ्या असीम आणि निराकार आकाशाचा रंग निळा असतो.

वैराग्याची प्राप्ती ज्याच्यामुळे होते अशी परमानंदी आणि निष्पाप चेतना म्हणजे शिव.

स्थायी आणि कायमस्वरूपी ऊर्जेचा स्त्रोत, एकमेव चिरंतन अस्तित्व म्हणजे शिव.

चराचरातील आत्मा म्हणजे शिव, आत्मा आणि शिव हे दोन्ही वेगळे नाहीत . ब्रह्मांडातील सर्वात मोठे आश्चर्य हे आहे की एकच चेतना समस्त चराचरामध्ये कशी वास करू शकते.

तिला आकार नाही, परंतु ती प्रत्येक आकारामध्ये आहे.

रुद्राभिशेकात उच्चारतात की, “विरूपे भ्यो, विश्व रूपे भ्यशच यो नमो नमः”

विरूपे भ्यो म्हणजे ज्याला कोणताही आकार नाही. विश्व रूपे भ्यो म्हणजे तो ब्रह्मांडातील सर्व आकारांमध्ये आहे.

सर्व आकार हे निराकार शिव तत्वाचे प्रकटीकरण आहे. शिव सर्वत्र उपस्थित असणारी चेतना आहे, ऊर्जा केंद्र आहे.

अनादी आणि अनंत

शिव तत्व अनादी आणि अनंत आहे, शाश्वत आहे. तो जागृती, स्वप्न आणि निद्रा या चेतनेच्या अवस्थांच्या पुढील चेतनेची ध्यानस्थ अवस्था, ’तुर्यावस्था’आहे.
एक सुंदर कथा आहे. एकदा सृष्टीचा निर्माता ब्रम्हा आणि पालनकर्ता विष्णू ठरवतात कि शिवाला शोधून त्याला जाणून घेऊया. ब्रम्हा म्हणाले कि, ’मी त्याच्या डोक्याकडे वर जाऊन मस्तक पाहीन तर तुम्ही पायाकडे जा. ’मग हजारो वर्षे विष्णू खाली खाली तर ब्रम्हा वर वर जात राहिले. परंतु दोघांना यश आले नाही.
इथे याचा मतितार्थ असा आहे कि, शिवाला डोके आणि पाय नाहीत. शिवाला सुरवात आणि अंत नाही. शेवटी मध्यभागी भेटून दोघांनी मान्य केले कि शिव अनादी आणि अनंत आहे.
ब्रम्हांडाचा विस्तार अनंत असून हे ज्याच्यात सामावले आहे ती चेतना देखील अनंत आहे; तसेच ते अज्ञात आहे.ते निव्वळ प्रेम करावे असे आहे
 

शिवाला कसे जाणू शकता?

‘तपो योगा गम्य, ’आदिशंकराचार्य रचित वेद सार शिव स्तोत्रम मधील श्लोकाचा अर्थ असा आहे कि, शिवाला निव्वळ तप आणि योगाद्वारे समजू शकतो.

ॐ मुळे आपण जाणून घेऊ शकतो. जेंव्हा आपण ॐमध्ये खोलवर जातो तेंव्हा ब्रम्हांडाचा ओम हा प्राचीन ध्वनी ऐकू येतो.ॐ म्हणजे तुम्ही सतत म्हणता तो नव्हे तर सतत ऐकू येतो तो होय.

शिवाला कसे समजाऊन घ्यावे?

शिव तत्वाला जाणण्यासाठी प्राचीन ऋषी मुनींनी चार उपाय सांगितले आहेत :

१.अन्वोपाय : अहंकारावर उपाय करणे.

२.अन्व : ध्यान करणे.

३.सक्तोपाय : मौनामध्ये आपल्या शरीरातील शक्ती      केंद्रांना जागृत करणे.

४.संबवोपाय :स्वतःच्या विचारांपासून दूर रहाणे.  

 

‘श्रुती ज्ञान गम्यः’ (श्लोक : आदिशंकराचार्य रचित वेद सार शिव स्तोत्र) निव्वळ गाढ ध्यानामध्येच श्रुतीचे सखोल  ज्ञान प्राप्त करू शकतो, श्रुतीच्या या ज्ञानामुळे शिव तत्व जाणू शकतो.
योगशास्त्राशिवाय शिवाचा अनुभव मिळणार नाही. निव्वळ शारीरिक आसने म्हणजे नव्हे तर ध्यानावस्थेमध्ये शिवाचा अनुभव प्राप्त होणे म्हणजे योग होय, जो आपणास आतून ‘खूप छान’ अनुभव देतो.
आपल्या चेतनेच्या तीन अवस्था आहेत-जागृती, स्वप्न आणि निद्रा. एक चौथी अवस्था देखील आहे जेथे आपण ना जागे असतो, ना स्वप्न पाहत असतो, ना झोपलेले असतो. या अवस्थेमध्ये शरीर विश्रांती घेत असते आणि मन जागृत असते. कोठे आहात हे कळत नसते परंतु तुम्हाला जाणवत असते कि तुम्ही वर्तमान क्षणात आहात-हे शिव तत्व आहे, हा अनुभव निव्वळ ध्यानावस्थेत येतो.
स्वप्न आणि निद्रावस्थेत नसता तेंव्हा ही समाधी अवस्था अनुभवू लागता जेथे कोणत्याही काळजी किंवा चिंता नसतात. मग शिव तत्वाला कोठे शोधाल ? कैलास पर्वतावर ? नाही तर जागृती आणि स्वप्नावास्थेच्या मध्ये, गाढ निद्रा आणि जागृती मध्ये.
जेंव्हा तुम्ही ध्यान करता, काय अनुभव येतो तुम्हाला? जागृत किंवा स्वप्नावास्थेत नसता तेंव्हा त्या चौथ्या स्थितीचा अनुभव येतो, तेंव्हा तुम्ही तुमच्यातील शिव तत्वाशी जोडले जाता. त्या स्थितीमध्ये तुम्हाला गाढ विश्रांती मिळते जिच्यामुळे तुमचे मन ताजे तवाने, सूक्ष्म,सुंदर आणि निष्पाप बनते.

(*वैश्विक सत्यतेचा ध्वनी जो प्राचीन ऋषी मुनींनी स्वतः ऐकला, तो मग मानवाला समजू शकेल असा रुपांतरीत केला, हिंदू धर्मातील पवित्र साहित्य-वेद असे प्रकट झाले.)

शिवाचे वर्णन करणारे खूप सुंदर सुंदर श्लोक संस्कृतमध्ये आहेत, त्यापैकी :

‘नमामि शमिशां निर्वाण रुपम् | विभम् व्यापकम् ब्रम्हवेद स्वरूपम् |

निजं निर्गुणं निर्विकल्पम् निरीहं | चीदाकाशमाकाश वासं भजेहम् ||

(श्री गोस्वामी तुलसीदास यांनी शिव स्तुतीप्रित्यर्थ रचलेल्या ‘रुद्राष्टकम्’ मधील आरंभीचा श्लोक)

हे शिव तत्व आहे जे सर्वशक्तिमान आहे, आकाश तत्वाप्रमाणे सर्वव्याप्त आहे, ज्यामध्ये समस्त ज्ञान सामावले आहे. जे अनादी आणि गुणातीत आहे, अशी एक ध्यानावस्था आहे जेथे चेतनेच्या आकाश तत्वाशिवाय काहीही नाही.