तुम्हाला निवांतपणा हवा आहे कां? बरेच लोक आपल्या दैनंदिन दिनचर्येत इतके व्यस्त असतात की त्यांना थोडीशी विश्रांती घेण्याचीही उसंत नसते. प्रचंड धकाधकीच्या जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री बिछान्यावर पडेपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते. ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणे, त्यासाठी इतर कामे पुढे ढकलणे, ऑफिसात वेळेवर पोहोचणे आणि घरी परत येणे - यामुळे कधीकधी दिवसभरात जेवायलाही वेळ मिळत नाही, मग विश्रांती कधी घेणार?
यात भर म्हणून आपणास दररोज वेगवेगळ्या ताण तणावांना सामोरे जावे लागते. कुटुंबातील आर्थिक अडचणी आणि आरोग्याच्या कुरबुरी, कामाचा ताण, भावनिक आधाराची वानवा अशा रूपात तणाव आपल्या जीवनात घुसखोरी करू लागतो. हा तणाव आपणास शारीरिक आणि मानसिक स्तरावर अतिशय थकविणारा असतो म्हणून वेळीच तो टाळायला हवा. या तणावापासून मुक्त होण्यासाठी आणि निरामय जीवन जगण्यासाठी रोज योग सराव खूपच उपयुक्त ठरतो.
विश्रांतीसाठी योग I Yoga for Relaxation
शरीर आणि मनाचा संयोग घडवणाऱ्या गहन तत्व सामावलेल्या योगामुळे तणावाचे निर्मुलन होते आणि त्यातील काही विशिष्ट आसने तणावाशी लढण्यासाठी उपयोगाची आहेत. प्राणायाम आणि आसनांमुळे स्पष्ट मन,स्नायूंची सहजता आणि सकारात्मक ऊर्जा लाभते. योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, शरीरातील विविध इंद्रियांमध्ये समतोल प्राप्त होतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. तसेच योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर अधिक लवचिक होते.
खालील आसने केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते व दैनंदिन ऊर्जा लाभते:
- अर्धचंद्रासन: या आसनात शरीर ताणल्यामुळे आणि समतोल साधल्यामुळे पाठीच्या कण्याचा खालचा भाग, पोट व छातीसाठी उपयुक्त आहे.
- अधोमुखश्वानासन: या आसनाने पाठदुखी नाहीसी होते, ताणतणाव आणि औदासिन्य कमी होते तसेच शरीर नवचैतन्याने भरले जाते.
- हस्तपादासन: या आसनाने गुडघ्या मागील स्नायू, पाठीचा कणा आणि पोटातील अवयवांवर प्रभाव पडतो. तसेच मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह सुरळीत होऊन ताजेतवाने वाटू लागते.शवासन: या आसनामुळे शरीराला संपूर्ण विश्रांती लाभते आणि मनही शांत होते.
विश्रांतीसाठी प्राणायाम I Pranayamas for Relaxation
ऐच्छिकपणे श्वासावर केलेले नियंत्रण म्हणजेच प्राणायाम म्हणजे श्वास नियंत्रित करून मनाला ताब्यात ठेवणे होय. शरीरातील तणावाचे निर्मूलन करण्यासाठी प्राणायाम हा प्रभावशाली मार्ग आहे.
ताणतणाव दूर करण्यासाठी खालील प्राणायाम करावेत :
- कपालभाती प्राणायाम: या प्राणायामामुळे शरीरात चैतन्य निर्माण होते, तणाव दूर होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.
- नाडीशोधन प्राणायाम: दोन्ही नासिकांतून आलटून पालटून श्वास घेण्याच्या या प्रक्रियेत आपल्यातील ऊर्जेचे सूक्ष्म मार्ग मोकळे होत ऊर्जेचा प्रवाह सुधारला जातो. हा प्राणायाम तणाव दूर करण्यात सहाय्यक ठरते तसेच मन शांत व केंद्रीत होते.
- शितली प्राणायाम – या प्राणायामाने स्नायूंना विश्राम मिळते, डोळ्यांना गारवा लाभतो आणि मुखदुर्गंधी दूर होते.
- शितकारी प्राणायाम : हा प्राणायाम केल्याने रक्त शुद्ध होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- भ्रामरी प्राणायाम –भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडण्याच्या या प्राणायामाने मज्जासंस्थेला आराम लाभतो. ह्यामुळे क्रोध,बेचैनी,निद्रानाश, रक्तदाब कमी होतो, परिणामी शरीराचा व मेंदूचा ताण कमी होतो.
योगनिद्रा I Yoga Nidra
योगनिद्रा ही एक प्रकारची निद्राच आहे पण पूर्ण सजगतेने घेतलेली निद्रा. ही अशी झोप आहे ज्यात आपली जागरूकता आपण गमावत नाही. या खास वैशिष्ट्यामुळे अधिक जास्त शारीरिक चैतन्य अनुभवास येते, तसेच झोपेपेक्षा जास्त गहिरी विश्रांती लाभते. यामुळे औदासिन्य, उच्च रक्तदाब, पोटाचे विकार, दमा ह्यासारखे तणावजन्य विकार बरे होण्यास मदत होते.
आपल्या सवयीनुसार,साधारण झोप घेताना आपण मनावरचे ओझे पुर्णपणे उतरवून ठेवत नाही. ह्याचे कारण रोजच्या धावपळीच्या जीवनातले तणाव,निराशा,चिंता,वेदना,क्षोभ हे सारे झोपायला जाताना सोबतीला असतात. ह्यामुळे आपली झोप तेवढी गाढ नसते, आणि सकाळी उठतो तेव्हा पूर्ण विश्रांती झालेली नसते म्हणून आपण पूर्णपणे ताजेतवाने होत नाही.
योगाच्या नियमित सरावाने शरीर निरोगी आणि मन तणावमुक्त होत,नव्या उत्साहाने जगाला सामोरे जाता येते. म्हणूनच योगासन आणि प्राणायामाच्या सहाय्याने रोज सकाळी ताजेतवाने व्हा आणि स्वतःमधील आश्चर्यकारक बदल अनुभवा.
योगाच्या सरावामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्राप्त होत असले तरी योग कोणत्याही औषधोपचारासाठी पर्याय होऊ शकत नाही. श्री श्री योगा प्रशिक्षकाच्या कुशल मार्गदर्शनाखालीच योगासने शिकणे आणि सराव करणे गरजेचे आहे. काही आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या आणि श्री श्री योगा प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योग सराव सुरु करावा. तुमच्या जवळच्या ‘आर्टऑफ लिव्हिंग’ केंद्रात ‘श्री श्री योगा’ कार्यक्रमाबद्दल विचारणा करा. इतर माहिती आणि आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी आम्हाला info@srisriyoga.in वर संपर्क करा.