उच्च रक्तदाब ही एक गंभीर स्थिती आहे ,ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि मृत्यू देखील होतो. हा ‘सायलेंट किलर‘ अधिक धोकादायक आहे कारण त्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. म्हणून, आपल्याला खबरदारीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वतःची नियमितपणे तपासणी करणे. पुढची तार्किक पायरी म्हणजे उच्च रक्तदाब कसा नियंत्रित करायचा हे जाणून घेणे.
योग आणि प्राणायाम हे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे दोन नैसर्गिक मार्ग आहेत.
उच्च रक्तदाब म्हणजे काय
रक्तदाब म्हणजे आपल्या धमन्यांमधील रक्ताचा दाब. योग्य दाब प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतो आणि त्याचे नियमन करणे आवश्यक आहे. तरच आपली प्रणाली सुरळीतपणे कार्य करेल. अमेरिकन हार्ट असोसिएशन १२०/८० ला मानक रक्तदाब मर्यादा मानते. आपले पॅरामीटर १२०/८० आणि १४०/९० दरम्यान असते तेव्हा प्री-हायपरटेन्शन असते. १४०/९० वरील रक्तदाब हा उच्च रक्तदाब आहे आणि धोकादायक आहे.
उच्च रक्तदाब कशामुळे होतो
- उच्च रक्तदाब ही एक वेगळी स्थिती आहे ज्याचा अर्थ तो मधुमेह, हृदयाशी संबंधित समस्या किंवा किडनी खराब होणे यासारख्या इतर वैद्यकीय स्थितींमुळे सुरू होत नाही.
- मानसिक तणाव हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे ज्यामुळे उच्च रक्तदाब होतो. जेंव्हा आपण तणावात असतो तेंव्हा आपल्या हृदयाचे ठोके जलद होतात आणि आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.
- इतर घटक जसे की धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन यासह प्रतिकूल जीवनशैली मुळे देखील हानी होते.
- जर आपण पुरेसा व्यायाम करत नसाल किंवा वजन जास्त असेल तर आपणास उच्च रक्तदाबाची शक्यता वाढते.
उच्च रक्तदाब कसे नियंत्रित करावे
उच्च किंवा कमी रक्तदाब दोन्ही योग्य नाहीत; शरीरात संतुलन आवश्यक आहे. निरोगी आहाराच्या सवयी संतुलित राखण्यास हातभार लावतात, परंतु आपण मनाच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तर, आपण दोन्हीमध्ये ताळमेळ कसा साधू शकतो? याचे उत्तर योगाच्या प्राचीन विज्ञानात आहे. नियमितपणे साध्या आसनांचा सराव केल्याने, योगा आपणास रक्तदाबाच्या समस्येचा सामना करण्यास मदत करेल.
कां : उच्च रक्तदाबासाठी योग
- योगासनांमध्ये आपल्या शरीराच्या विशिष्ठ हालचाली करताना जाणीवपूर्वक आणि खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा असतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होऊन नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.
- योगासने मज्जातंतूंना शांत करू शकतात आणि वाढलेली हृदय गती कमी करण्यास मदत करू शकतात.
- योगासने रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात यांसारख्या हृदयविकाराच्या घटना कमी करण्यास मदत करते.
- पुरेशा विश्रांतीचा अभाव हे तणाव आणि उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. योगामुळे झोपेच्या सवयी आणि गुणवत्ता नियमित करण्यात मदत होते.
- लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो. योगाचा नियमित सराव आणि सुधारित आहार शरीराचे वजन नियंत्रित करतो.
- योगामुळे शरीर आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते. हे तुम्हाला जीवनात अधिक आनंदी आणि अधिक आशावादी बनवते. दीर्घकाळापर्यंत, रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
कसे: उच्च रक्तदाबासाठी योग
खालील योगासने उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतात. तथापि, प्रशिक्षित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सराव करणे चांगले.
उच्च रक्तदाबासाठी प्रभावी योगासनांची यादी
- शिशुआसन
- वज्रासन
- पश्चिमोत्तानासन
- शवासन
- सुखासन
- अर्ध मत्स्येंद्रासन
- बद्धकोनासन
- जानुशिर्षासन (एक पाय पुढे वाकणे)
- वीरासन
- सेतू बंधनासन
- अर्ध हलासन
- शिशुआसन
तणाव आणि थकवा दूर करते. हे रक्ताभिसरण देखील सामान्य करते.
- वज्रासन
हे आसन जेवणानंतरही करता येते. हे लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत करते आणि खालच्या ओटीपोटात रक्त प्रवाह वाढवते.
- पश्चिमोत्तानासन
ओटीपोटातील चरबी कमी करण्यास मदत करते, त्यामुळे वजन कमी होते. हे एक प्रभावी तणाव निवारक म्हणून देखील कार्य करते आणि उच्च रक्तदाब सामान्य करते.
- शवासन
तणाव, नैराश्य आणि थकवा दूर करते. हे शरीराला आराम करण्यास आणि शांत झोपेची तयारी करण्यास मदत करते. हे रक्ताभिसरण देखील उत्तेजित करते. आपण योग निद्राचाही सराव करू शकता.
- सुखासन
हे ध्यानधारणा शांत करते आणि शरीर आणि मन एकत्र करते. हे उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत करते कारण ते आपले शरीर अधिक संतुलित आणि आपले मन मुक्त आणि आनंदी बनवते.
- अर्ध मत्स्येंद्रासन
हृदय आणि मज्जासंस्था उत्तेजित करते, उच्च रक्तदाब सामान्य करण्यास मदत करते.
- बद्धकोनासन
हृदयाला उत्तेजित करते आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते. यामुळे तणाव आणि थकवा देखील दूर होतो.
- जानुशिर्षासन
आपल्या पोटातील अवयवांची मालिश करून पोटातील चरबीवर प्रभावीपणे कार्य करते. वजन कमी करण्यावर परिणाम करून, ते रक्त दाबाचे नियमन करण्यास मदत करते , जेणेकरून ते सामान्य पातळीवर राहते.
- विरासन
पायाभोवती रक्ताभिसरण वाढते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
- सेतुबंधासन
मूत्रपिंडांना ऊर्जा देते आणि मज्जासंस्था शांत करते. हे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
- अर्ध हलासन
मांड्या, ओटीपोट आणि नितंबांमधील चरबी जाळण्यास मदत करते. तसेच उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
उच्च रक्तदाबासाठी प्राणायाम
योगासनांव्यतिरिक्त, हे प्राणायाम किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील तुमच्या रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यात मदत करू शकतात.
- भस्त्रिका प्राणायाम
- कपालभाती प्राणायाम
- भ्रामरी प्राणायाम
- नाडी शोधन प्राणायाम
- पूर्ण योगिक श्वास
भस्त्रिका प्राणायाम
शरीराच्या सर्व भागांना प्राणवायूचा पुरवठा वाढवते, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तसेच तणाव आणि उच्च रक्तदाब दूर करते.
- कपाल भाती
पोटातील चरबी काढून टाकण्यास मदत करते आणि सामान्य वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
- भ्रामरी प्राणायाम
या प्राणायामामुळे निर्माण होणारी कंपने आतमध्ये गुंजतात आणि शरीर आणि मनाला खोलवर आराम देतात. हे तणाव आणि चिंता दूर करते आणि उच्च रक्तदाब संतुलित करण्यास देखील मदत करते.
- नाडी शोधन प्राणायाम
हा शांत आणि शक्तिशाली प्राणायाम आपल्या रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यास मदत करतो. यामुळे डोक्याच्या भागातील रक्ताभिसरण देखील सुधारते.
- पूर्ण योगिक श्वास
हळूहळू श्वास घेण्यास मदत करते. जर आपली हृदय गती खूप वेगवान असेल, तर हे तंत्र ते कमी करण्यास मदत करते आणि आपले संपूर्ण शरीर आराम करते.
या गोष्टी पाळण्याची खबरदारी
शीर्षासन किंवा अधोमुख वक्रासन सारखी उलटी मुद्रा टाळा. या पोझमध्ये, आपले डोके आपल्या हृदयापेक्षा खालच्या पातळीवर येते ज्यामुळे डोक्यात अचानक आणि अनियंत्रित रक्त येऊ शकते.
निरोगी जीवनशैलीच्या पर्यायांसह योग आणि प्राणायाम एकत्र करणे केंव्हाही उत्तम. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, आपल्या आहाराचे नियमन करा आणि धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयी टाळा. एका वेळी एक पाऊल टाका आणि परिणामांची घाई करू नका. त्यानंतर आपणास आपल्या रक्तदाबाच्या समस्यांसाठी सर्वांगीण बरे होण्याचा एक साधा मार्ग सापडेल.
आपला कमी रक्तदाब कमी आहे कां? आपण हायपोटेन्शनचा सामना कसा करू शकता ते शोधा.